रस्त्यांच्या संथगती कामाचा मनसेकडून समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:09 AM2021-02-12T01:09:35+5:302021-02-12T01:09:49+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली दखल : गांधीगिरी मार्गाने केला यंत्रणेचा निषेध

News from MNS about the slow work of roads | रस्त्यांच्या संथगती कामाचा मनसेकडून समाचार

रस्त्यांच्या संथगती कामाचा मनसेकडून समाचार

Next

डोंबिवली :  ठाकुर्ली परिसरातील ९० फिट रोड आणि रेल्वे समांतर रस्त्यावर गेली दोन वर्षे संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत गुरुवारच्या ‘लोकमत’मध्ये ‘दोन वर्षे रस्त्याची कामे सुरू असल्याने गैरसोय’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच मनसेने याची दखल घेत अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदविला. येत्या दोन दिवसात ९० फिट रोड वाहतुकीसाठी खुला केला नाही तर मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी यावेळी दिला. 

केडीएमसी परिक्षेत्रात अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी असो अथवा महानगर गॅसवाहिनी टाकण्याची  कामे करण्यात आली. परंतु ठाकुर्लीतील ९० फिट रोड आणि कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर मात्र दोन वर्षांहून अधिक काळ ही कामे सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगर गॅसच्या माध्यमातून ही कामे सुरू करण्यात आली, परंतु ही कामे संथगतीने सुरू असल्याने दोन्ही रस्त्यांवरील एका दिशेकडील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. याचाच एक भाग असलेल्या कल्याणहून डोंबिवलीकडे येणाऱ्या समांतर रस्त्यावर मलवाहिनी टाकण्याचे काम मार्गी लागूनही डांबरीकरण झालेले नाही. तर ९० फिट रोडवरील म्हसोबा चौक ते  खंबाळपाडा रोडकडे जाणारा रस्ताही अनेक दिवसांपासून खोदकामांमुळे बंद आहे. खंबाळपाड्यातून म्हसोबा चौकाकडे येणारा मार्गही खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांची कसरत सुरूच आहे. ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो अथवा महानगर गॅसच्या माध्यमातून सुरू असली तरी त्यावर केडीएमसीचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. 

दरम्यान, गुरुवारी यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच घरत यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत संथगती कामाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन जाब विचारला. 

यावर संबंधित अधिकाऱ्यांनी ९० फिट रोडवरील एका दिशेने झालेल्या कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करून तातडीने रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला जाईल असे आश्वासन दिले.  
 

Web Title: News from MNS about the slow work of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे