NMMT बसला कल्याण-शीळ रोडवर आग; बॅटरीने घेतला पेट, जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 09:31 PM2022-02-13T21:31:01+5:302022-02-13T21:35:40+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या बसला रविवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना मानपाडा परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेच्या बसला रविवारी दुपारी १२.४५ सुमारास भीषण आग लागल्याची घटना मानपाडा परिसरात घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. बस दुरुस्त करत असताना बॅटरीने पेट घेतल्याने बसला आग लागल्याचे बोलले जातेय.
रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एनएमटीची बस प्रवाश्यांना घेऊन घणसोलीकडे रवाना झाली होती. मात्र कल्याण शिळ रोड वरील मानपाडा बस स्थानकाजवळ बस आल्या नंतर बसचे ब्रेक डाऊन झाल्याचं समजताच वाहनचालक आणि वाहक यांनी प्रवाशांना वाहनामधून उतरवून बस रिकामी केली होती. त्यानंतर वाहतूक कोंडी होत असल्याने बस ढकलत ढकलत मानपाडा बस स्टॉपच्या पुढे नेण्यात आली होती. यानंतर दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास बस दुरुस्त करत असतानाच बॅटरीने पेट घेतला आणि क्षणातच आग वाढू लागली. या आगीत बस जळून खाक झाली असून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.दरम्यान वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनचालकांना रस्त्यावरील वाट मोकळी करून दिली आहे.तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झाले आहे.