असंतोषाला तोंड देणे कठीण जाईल म्हणून मंत्रीमंडळ विस्तार नाही - एकनाथ खडसे
By प्रशांत माने | Published: January 29, 2023 05:03 PM2023-01-29T17:03:06+5:302023-01-29T17:03:37+5:30
‘सी’ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील असा दावा करण्यात येतोय. याबाबत बोलताना खडसे यांनी हा सर्व्हे सद्य परिस्थितीवर आधारित असल्याचे भाष्य केले.
कल्याण: मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल व असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून विस्तार केला जात नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी कल्याणमध्ये केले. लेवा पाटीदार समाजाच्या मेळाव्यासाठी आलेल्या खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारासहीत अनेक मुद्यांवर बोलताना सरकारला लक्ष केले.
सरकार स्थापन होवून सात महिने झाले मात्र आजही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. १८ मंत्री या राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते निर्णय होवू शकत नाही जनसंपर्क कमी पडतोय. सरकारमधील सर्वच आमदार मंत्रीमंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला घ्यावे हा पेच असल्याने विस्तार होत नाही. विस्तार झाल्यास असंतोष उफाळेल आणि त्याला तोंड देण कठीण जाईल म्हणून विस्तार लांबणीवर पडल्याकडे खडसे यांनी लक्ष वेधले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली मात्र याबाबत युतीचा प्रस्ताव किंवा कुठलेही बोलणे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालं नाही. तसा प्रस्ताव आल्यानंतर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील असे खडसे यांनी बहुजन वंचित आघाडी व शिवसेना यांच्या युतीबाबत बोलताना स्पष्ट केले.
सद्य परिस्थितीच प्रतिबिंब ‘सी’ सर्व्हेत दिसतेय
‘सी’ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील असा दावा करण्यात येतोय. याबाबत बोलताना खडसे यांनी हा सर्व्हे सद्य परिस्थितीवर आधारित असल्याचे भाष्य केले. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झाले. अलीकडे राज्यात महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आहेत इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जातात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्रावर ६ लाख ६६ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय. एकंदरीत सर्व स्थिती पाहता सर्वसामान्य माणूस प्रत्यक्ष स्थिती अनुभवतोय त्यामुळे या सरकारचा विरोधात तो मतदान करेल अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली.