Coronavirus Vaccination : कल्याण डोंबिवलीत उद्याही लसीकरण बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 08:34 PM2021-07-08T20:34:55+5:302021-07-08T20:35:26+5:30
Coronavirus Vaccination : बुधवार आणि गुरुवारीही बंद होतं लसीकरण केंद्र.
शासनाकडून लससाठा उपलब्ध नसल्याने उद्या कल्याणडोंबिवली महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही ही सूचना आता नागरिकांसाठी नवीन राहीली नाही. कारण गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील लसीकरण मोहीम थंडावली असून शुक्रवारी (९ जुलै) सुद्धा शहरातले लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे कोणी 'लस देता का लस' असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे. मागील आठवड्यात फक्त सोमवारी आणि शनिवारी लसीकरण सुरू होते. या आठवड्याच्या सुरवातीलाच लसीकरण बंद असल्याने नागरीकांचा हिरमोड झाला होता.
मंगळवारी लसीकरण सुरू असल्याने नागरीकांनी गर्दी केली होती. मात्र बुधवारी, गुरुवारी आणि आता पुन्हा शुक्रवारीसुद्धा लसीकरण मोहीम बंद ठेवण्याची नामुष्की केडीएमसी प्रशासनावर ओढावली आहे. एकीकडे खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध होत असताना केडीएमसीची लसीकरण केंद्र वारंवार लसींचा तुटवड्याअभावी बंद ठेवावी लागत आहेत.