‘ते’ आमच्यासोबत राहणार यात शंका नाही; भाजप-मनसे संभाव्य युतीला चव्हाण यांचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 07:50 AM2024-03-11T07:50:51+5:302024-03-11T07:53:19+5:30
हिंदुत्वाचा व विकासाचा अजेंडा राबविला जात असेल तर ते आमच्यासोबत राहणार यात शंका नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: महायुतीच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील हेही आमच्यासोबतच आहेत. त्यांच्या पक्षाचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे, तोच आमचाही आहे. हिंदुत्वाचा व विकासाचा अजेंडा राबविला जात असेल तर ते आमच्यासोबत राहणार यात शंका नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी केले.
नवी मुंबई महापालिकेतील दहीसर मोरी या गावात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १४ कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी चव्हाण बोलत होते.
चव्हाण पुढे म्हणाले, पाटील यांनी या सर्व विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. लोकसभेपर्यंत ते १०० टक्के आमच्यासोबत राहतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातील असलेले आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत. त्यामुळे खासदार शिंदे यांना पुन्हा या मतदारसंघातून हॅट्ट्रिक करून निवडून देणार, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
‘पक्षाचे धोरण राज ठाकरे ठरवतील’
‘मी विकासासोबतच आहे. मात्र आमच्या पक्षाचे धोरण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतील,’ असे स्पष्टीकरण आमदार राजू पाटील यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर दिले.