कोरोनाचा नवा रुग्ण नाही; कल्याण-डोंबिवलीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:27 AM2022-03-05T11:27:39+5:302022-03-05T11:28:21+5:30
दोन्ही शहरांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : जानेवारीच्या सुरुवातीपासून वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत सध्या कमालीची घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. केडीएमसी हद्दीत शुक्रवारी एकही कोरोनाबाधित आढळून न आल्याने दोन्ही शहरांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
मनपाच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्च २०२० ला सापडला. पहिल्या लाटेत एका दिवसात सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. तर पहिल्या लाटेत सर्वांत कमी दैनंदिन रुग्णसंख्या २४ नोंदविली गेली. तर दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला. यात सर्वाधिक नागरिक बाधित झाले. तसेच मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्या लाटेत एका दिवसात दोन हजार ४०५ रुग्ण आढळले होते. मात्र ही लाट ओसरल्यावर सर्वांत कमी रुग्णसंख्या ६ इतकी नोंदविली गेली होती.
तिसऱ्या लाटेत सर्वाधिक एक हजार ६७२ रुग्ण एका दिवसात आढळले होते. परंतु आता लाट ओसरल्यावर नव्या आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या शून्य होती. गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच शुक्रवारी शून्य रुग्णसंख्येची झालेली नोंद नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी २६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सध्या केवळ १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकाचाही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत एकूण एक लाख ६३ हजार ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शिवसेनेकडून आयुक्तांचे अभिनंदन
केडीएमसी हद्दीत शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने शिवसेनेने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले. शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विधानसभा संघटक तात्या माने यांनी सूर्यवंशी यांना शाल-पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.