श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची ठाकरेंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:14 PM2024-01-15T16:14:14+5:302024-01-15T16:15:24+5:30
कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्याची परिस्थिती पाहता, मिंदे गट काहीही ओरडू दे, मतदारांचा कौल हा ठाकरेंसोबत आहे असं डोंबिवली शहरप्रमुखांनी सांगितले.
कल्याण - काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. याठिकाणी शाखा भेटीवर भर देत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या मतदारसंघात दंड थोपटले. ठाकरे यांनी मी या मतदारसंघात गद्दाराला नाही तर एक निष्ठावंत उमेदवार देईन अशी घोषणा केली होती. त्यानंतर कल्याण लोकसभेत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सुरू होती. त्यातच आता या मतदारसंघात सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्या अशी मागणी ठाकरे गटाच्या डोंबिवली शहरप्रमुखाने केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ठाकरे गटाचे डोंबिवली शहरमुख विवेक खामकर म्हणाले की, कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्याची परिस्थिती पाहता, मिंदे गट काहीही ओरडू दे, मतदारांचा कौल हा ठाकरेंसोबत आहे. याठिकाणी सर्वसामान्य पदाधिकारीही दिला तरीही टेन्शन नाही. सुभाष भोईरही लोकसभेच्या रिंगणात आहेत. आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली होती. कारण हा मतदारसंघ त्यांच्या फेव्हरचाही आहे. आता दीड वर्षात काही उलाढाली झाल्या त्याला जशास तसे उत्तर द्यायला सुषमा अंधारे या सक्षम आहेत असा आमचा विचार आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आदित्य ठाकरे आता महाराष्ट्रभर नाही तर भारताच्या नेतृत्वातील एक झालेत. आदित्य ठाकरे किरकोळ कल्याण लोकसभा मतदारसंघ कशाला लढवायला येतील. त्यांचा दुसरा मतदारसंघ आहे. बोलणारे बोलतील. बोलायला काय जाते. आदित्य ठाकरेंसारखा अभ्यास पाहता शिंदे गटातील एक तरी आमदार दाखवावा ज्याच्याकडे आधुनिक विचारसरणी आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जे व्हिजन आहे त्यावर एकानेही समोर बसून चर्चा करावी असंही खामकर यांनी म्हटलं.
दरम्यान, श्रीकांत शिंदेंच्या डोळ्यावर चामड्याचे चष्मे आहेत. कारण जे जाहीर होते त्याचे व्हिडिओ पाहा. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला कट्टर हाडाचा शिवसैनिक आला होता. कुठेही न विकला जाणारा कार्यकर्ता होता. आम्ही ३००-४०० रुपयांनी विकत घेतलेली गर्दी नव्हती. ठाकरेंची ही शाखा भेट होती. बैठक आणि सभा नव्हत्या. फक्त विधानसभेतील शहर शाखांना भेट देण्यासाठी ते आले होते. गर्दीला आवरताना आमच्या नाकीनऊ आले त्यामुळे या लोकांना टीका करायला काय जातंय असा टोलाही खामकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला.