मला दिलेली उमेदवारी हा बहिणीचा केलेला सन्मान - सुलभा गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 07:20 PM2024-10-20T19:20:05+5:302024-10-20T19:20:18+5:30
उमेदवारी जाहीर होताच कल्याण पूर्वेत जल्लोष
प्रशांत माने/कल्याण: रविवारी भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहिर झाली. यात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विदयमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. सुलभा यांचे नाव जाहीर होताच पुर्वेत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. मला दिलेली उमेदवारी हा बहिणीचा केलेला सन्मान असल्याची प्रतिक्रिया गायकवाड यांनी यावेळी दिली. त्यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार देखील मानले.
दोनदा अपक्ष आणि एकदा भाजप असे तीन टर्म कल्याण पूर्वेत आमदार राहीलेल्या गणपत गायकवाड यांना शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे यंदा उमेदवारी मिळणार नाही अशीच शक्यता वर्तविली जात होती. परंतू त्यांचे तिकिट कापले असलेतरी त्यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान या मतदारसंघात शिंदेसेनेचे निलेश शिंदे आणि महेश गायकवाड हे दोघेदेखील इच्छुक होते. गणपत गायकवाड यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन, असे वक्तव्य महेश गायकवाड यांनी तीनच दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने महेश गायकवाड आता कोणती भुमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.