वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे यांचे नामांकन

By मुरलीधर भवार | Published: March 25, 2024 03:15 PM2024-03-25T15:15:45+5:302024-03-25T15:17:23+5:30

संस्थेकडे सध्या वन्यजीव आणि रस्त्यावरील प्राण्यांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहेत.

nomination of nilesh bhange for an honorary doctorate by the academic council of washington digital university | वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे यांचे नामांकन

वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे यांचे नामांकन

मुरलीधर भवार, डोंबिवली-वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे ह्यांचे नामांकन मंजूर केले आहे. ही प्रतिष्ठित ओळख प्राणी कल्याणासाठी उत्कृष्ट योगदानाचा दाखला आहे.

भणगे यांनी वयाच्या १८ व्या वर्षी प्राणी कल्याणासाठी काम करायला सुरुवात केली, ते २७ वर्षापासून कार्यरत आहेत. .२००१ साली भणगे यांनी ठाणे जिल्ह्यात प्लांट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी अर्थात पॉज नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील पहिली ॲनिमल ॲम्ब्युलन्स सुरू केली. रस्त्यावर पडलेल्या जखमी आणि आजारी पशू-पक्ष्यांना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याची सोय केली. आतापर्यंत त्यांनी नवीन संस्थाना ५ रुग्णवाहिका भेट दिल्या आहेत. संस्थेकडे सध्या वन्यजीव आणि रस्त्यावरील प्राण्यांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहेत.

२००५ साली त्यांच्या टीमच्या कामाची दखल घेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांच्या टीमला 'इंडियाज यंगेस्ट ॲनिमल रिहॅबिलिटेशन टीम' असे नाव दिले. भगणे यांना आत्तापर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. पेटाच्या अमेरिकेतील इनग्रीड न्यूकर्क यांनी २००७ साली कोरड्या विहिरीमध्ये अडकलेल्या एका मांजरीचे पिल्लू वाचवल्याबद्दल त्यांना 'हिरो टू ॲनिमल्स' पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०११३ मध्ये इनरव्हील क्लबने 'आऊटस्टँडिंग सर्व्हिस टू सोसायटी' आणि २०१२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनने गोव्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत 'स्वयंसेवक संबंध पुरस्कार' प्रदान केला. २०२२ मध्ये प्राणी कल्याण योगदानाबद्दल प्रतिष्ठित 'आयकॉन्स ऑफ एशिया ऑफ अवॉर्ड' मिळाला.

२०१० मध्ये माजी केंद्रीय मंत्री श्रीमती मेनका गांधी यांनी नीलेश यांना ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे पशु रुग्णालय मुरबाड येथे चालविण्याचे काम दिले. याठिकाणी दरवर्षी हजारो प्राण्यांना वैद्यकीय सेवा आणि जीवन आधार प्रदान केला जातो. ३० हजाराहून अधिक वन्य जीवांना जीवदान दिले आहे. भणगे यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात पाळीव हत्तींवर संशोधन केले. त्यांचे चार संशोधन अहवाल प्रकाशित आहेत. त्यांच्या अहवालामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यात भीक मागण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्तींवर बंदी घालण्यात आली. निलेश हे स्वतः वन्यजीव छायाचित्रकार आहेत. नॅशनल सर्कसमधून १२ सिंह आणि २ वाघांची सुटका करुन त्यांना बंगळुरू येथील केंद्र सरकारच्या पुनर्वसन केंद्रात पाठवले. भगणे यांनी सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ आणि हाँगकाँग येथे विविध वन्यजीव आणि प्राणी कल्याण परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे. पॉज टीम आणि फ्रेंड सर्कल यांच्या सहकार्याशिवाय हा सन्मान मिळू शकला नसता आणि ते आभारी आहेत, असे भणगे म्हणाले.
 

Web Title: nomination of nilesh bhange for an honorary doctorate by the academic council of washington digital university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.