मोबाइल, टीव्ही बघू दिला नाही, रागात घरातून पळाले; ११ महिन्यात १८७ मुलांनी घर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:07 AM2023-12-08T11:07:06+5:302023-12-08T11:07:19+5:30

देशभरातून रेल्वेने आलेली १८७ मुले उतरली कल्याण, डोंबिवलीत  

Not allowed to watch mobile, TV, ran away from home in anger; 187 children left home in 11 months | मोबाइल, टीव्ही बघू दिला नाही, रागात घरातून पळाले; ११ महिन्यात १८७ मुलांनी घर सोडले

मोबाइल, टीव्ही बघू दिला नाही, रागात घरातून पळाले; ११ महिन्यात १८७ मुलांनी घर सोडले

अनिकेत घमंडी

डोंबिवली : खेळायला मोबाइल दिला नाही.. टीव्ही बघू दिला नाही.. अभ्यासाच्या कारणावरून आईवडील रागावले.. पालकांमधील भांडणं.. अशा एक ना अनेक क्षुल्लक अथवा गंभीर कारणांमुळे तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचे, बॉलिवूडमधील फिल्म स्टार्सना भेटण्याच्या इच्छेमुळे मुले, मुली घरातून पळून मुंबईत येण्याच्या घटना वाढत आहेत. ही मुले बरेचदा कल्याण रेल्वे जंक्शनवर उतरतात.

गेल्या ११ महिन्यांत कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलिसांना किरकोळ कारणास्तव घर सोडून आलेली १८७ मुले आढळली आहेत. त्यापैकी १८५ मुले पोलिसांनी स्वगृही पाठवली.  पोलिसांच्या नजरेस न पडलेल्या व परिणामी वेगवेगळ्या अनैतिक धंदे, व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलांची गणतीच नाही. 

अशी वाट चुकलेली मुले पोलिसांच्या नजरेस पडली तर त्यांची घरवापसी होते. मात्र जर ती रेल्वेस्थानकातून बाहेर पडली तर भीक मागण्यापासून अमली पदार्थ विक्रीपर्यंत आणि वेश्याव्यवसायापासून चोऱ्यामाऱ्या करण्यापर्यंत अनेक गैरमार्गाला लागतात. ही सर्व मुले साधारण ८ ते १७ वयोगटांतील असून, महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमधून देशभरातून लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून येतात. घरातून पळून जाण्यापूर्वी मुंबई, ठाणे, कल्याण येथील नातलग किंवा मित्राशी संधान साधून ती आली असतील तर पोलिस त्यांना शोधू शकत नाहीत. 

१८७ पैकी १८५ मुले स्वगृही
पळून आलेली मुले पोलिसांच्या किंवा दक्ष प्रवासी यांच्या निदर्शनास येतात. प्रवासात भुकेल्या असलेल्या मुलांना आधी खायला, पाणी प्यायला देऊन भयमुक्त केले जाते. थोडा वेळ जाऊ दिला की, ती खरी माहिती देतात. माहिती मिळाल्यावर अशा मुलांच्या पालकांना  बोलावून घेतले जाते. खातरजमा करून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना पालकांच्या स्वाधीन केले जाते.

येथून आली मुले-मुली
महाराष्ट्रातून नांदेड, कोल्हापूर, नागपूर आदी भागांतून मुले पळून आली. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतूनही मुले मुंबईत पळून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

असे केले जाते समुपदेशन
रेल्वेस्थानकात उतरलेली मुले प्लॅटफॉर्मवरील उपाहारगृह, पाणपोई, पादचारी पूल, तिकीट घर आदी ठिकाणी आडोशाला उभी राहतात. पोलिस, दक्ष नागरिक यांनी या मुलांना हेरल्यावर पोलिस त्यांचा ताबा घेतात. मोठी मुले माहिती देतात, लहान मुलांना बोलते करण्यात समुपदेशकाची महत्त्वाची भूमिका असते.

कल्याणमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्या देशभरातून येतात, त्यामुळे तेथे विविध कारणांमुळे पळून आलेली लहान मुले-मुली आढळून येण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. शेकडो मुले कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली आहेत. सहप्रवाशांनीही अशी मुले आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. - अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण जीआरपी

Web Title: Not allowed to watch mobile, TV, ran away from home in anger; 187 children left home in 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.