"पगार घेऊनही काम करत नाही, तुम्हाला झोप कशी लागते?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:15 AM2022-09-14T07:15:04+5:302022-09-14T07:15:27+5:30

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उडविली अधिकाऱ्यांची झोप

"Not even working for a salary, how do you sleep?" Anuraj Thakur angry on KDMC | "पगार घेऊनही काम करत नाही, तुम्हाला झोप कशी लागते?"

"पगार घेऊनही काम करत नाही, तुम्हाला झोप कशी लागते?"

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत एकेक प्रकल्प दहा वर्षे सुरू आहे. त्यांची कामे पूर्ण का होत नाहीत? पालिका अधिकाऱ्यांना पगार देते. तुम्ही पगार घेता ना? मग काम करायला नको? पगार घेऊनही काम करत नाही. तुम्हाला झोप कशी लागते? माझी ही आढावा बैठक गमतीने घेऊ नका. मी दोन महिन्यांत परत येईन. तेव्हा जर कामे झालेली नसली, तर मी कोणाचीही गय करणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याने त्यांची झोप उडाली. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीतील सोमवारी दिवसभराचा दौरा आटोपल्यानंतर ठाकूर यांनी महापालिका मुख्यालय गाठले. स्मार्ट सिटी कंट्रोल रूमला भेट दिली. त्यानंतर, त्यांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची चार तास जम्बो मीटिंग पालिकेच्या सभागृहात घेतली. स्मार्ट सिटी, बीएसयूपी योजना, मलनिस्सारण प्रकल्प आदी प्रकल्पांच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, एक-एक प्रकल्प दहा वर्षे सुरू आहे. जर अधिकारी पालिकेकडून पगार घेतात. तो घेतल्यानंतरही त्यांना काम करावेसे वाटत नाही. ही बाब गंभीर आहे. पगार घेऊनही काम न करता, अधिकाऱ्यांना झोप कशी लागते, असा प्रश्न ठाकूर यांनी केला. ही आढावा बैठक कोणत्याही अधिकाऱ्याने गमतीने घेऊ नये. सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामाचा अहवाल मला दिल्लीत जाऊन द्यायचा आहे. 

आता काय अहवाल द्यायचा, हा प्रश्नच आहे. मी पुन्हा दोन महिन्यांनी परत येईन. तेव्हा आता चर्चा झालेल्या प्रकल्पांच्या कामात प्रगती नसेल, तर मी कोणाचीही गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. ठाकूर यांचा रौद्रावतार पाहून भाजपचे नेतेही स्तंभित झाले. अनेक अधिकाऱ्यांना दरदरून घाम फुटला आणि दीर्घकाळ या महापालिकेत सत्तेवर राहिलेल्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, संजय केळकर आदी उपस्थित होते.

ही शहरे स्मार्ट आहेत?
शहरांची बकाल अवस्था पाहिलेली असल्याने कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट सिटी प्रकल्पात आहेत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. येथील रस्ते खराब आहेत. त्यावर खड्डे आहेत. शहरात स्वच्छता नाही. अशा परिस्थितीत स्मार्ट सिटीचे काय काम झाले, असा प्रश्न त्यांनी केला.  

Web Title: "Not even working for a salary, how do you sleep?" Anuraj Thakur angry on KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.