कोपर पुलासाठी ४७ रहिवाशांना नोटिसा, केडीएमसीची कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 12:23 AM2020-12-23T00:23:46+5:302020-12-23T00:24:07+5:30
Kopar bridge : पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना डाव्या दिशेकडील रहिवाशांचा त्यात प्रामुख्याने समावेश असून एका इमारतीचा बाल्कनीचा काही भाग त्यात तुटण्याची शक्यता असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
डोंबिवली : शहराला पूर्व-पश्चिम जोडल्या जाणाऱ्या कोपर दिशेकडील उड्डाणपुलाचे काम सुरू असून पुलाच्या पूर्वेकडील लँडिंगच्या पोहोच रस्त्यालगत असलेल्या व बांधकामात अडथळे ठरणाऱ्या बांधकामांना महापालिकेच्या ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. या बांधकामांत वास्तव्य करणाऱ्या ४७ रहिवाशांना त्यांच्या वास्तव्याची कागदपत्रे मनपाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना डाव्या दिशेकडील रहिवाशांचा त्यात प्रामुख्याने समावेश असून एका इमारतीचा बाल्कनीचा काही भाग त्यात तुटण्याची शक्यता असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच त्यापुढील भागात असलेल्या चाळीमधील काही घरांचा भाग बाधित होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात मनपाने संबंधितांना दिलेल्या नोटीसमध्ये विकास प्रकल्पामध्ये ती बांधकामे येत असल्याने कारवाई करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र राहत्या घराचा काही भाग तुटण्याची शक्यता असल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यावर काही पर्याय निघतो का, यासाठी रहिवासी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची भेट घेत आहेत. एका चाळीतील रहिवाशांनी एवढी वर्षे वास्तव्य केल्यावर आता कागदपत्रे कुठे व कशी शोधायची, असा सवाल करीत, आमचे घर वाचवावे, अशी मागणी केली.
यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाच्या कामात अडथळा येणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच पुलालगत पादचाऱ्यांना चालण्यासाठी जी जागा लागते त्याला जर खालील रस्त्यावरून योग्य उंची मिळाली तर संबंधित रहिवाशांना दिलासा मिळू शकतो का, याचा अभ्यास सुरू आहे. पण, त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे.
कोपर उड्डाणपूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या जागेकरिता नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर मिळालेल्या यादीनुसार संबंधित रहिवाशांना नोटीस दिली होती. नगररचना विभाग व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल
- स्नेहा करपे, ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी