धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमलबजावणी न करणाऱ्या २५ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

By अनिकेत घमंडी | Published: November 21, 2023 02:04 PM2023-11-21T14:04:31+5:302023-11-21T14:06:25+5:30

आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांचे आदेशानुसार कार्यवाही, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्वेत बंद पाडले काम.

notice to 25 builders for not implementing dust prevention measures | धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमलबजावणी न करणाऱ्या २५ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमलबजावणी न करणाऱ्या २५ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

अनिकेत घमंडी, डोंबिवली : उच्च न्यायालयातील दाखल सुमोटो जनहित याचिकेच्या निर्णयान्वये महापालिका क्षेत्रात धुळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या २५ बांधकाम व्यावसायिकांना ठिकठिकाणी प्रभाग अधिकाऱयांनी नोटीस बजावल्या आहेत. ब प्रभागात सर्वाधिक नोटीस बजावण्यात आल्या असून कल्याण पश्चिमेत एका साईटचे काम महापालिकेने बंद केले आहे. धूळ कमी करण्यासाठी उपाययोजनांवर तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी दोन दिवसांत पाहणी करुन नियमांचे/मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी सोमवारच्या बैठकीत संबंधित अधिका-यांना दिले होते.

त्याअनुषंगाने धुळ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणेकामी /ब प्रभागात सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी १० बांधकाम विकासकांना, जे प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी ४ बांधकाम विकासकांना, तर फ प्रभागातही सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी ५ बांधकाम विकासकांना, ई प्रभागात सहा.आयुक्त भारत पवार यांनी देखील ४ बांधकाम विकासकांना, त्याचप्रमाणे आय प्रभागाच्या हेमा मुंबरकर यांनी २ बांधकाम विकासकांना नियमांचे पालन करणेबाबत अशा।एकूण २५ जणांना नोटीसा बजावल्याची माहिती जनसंपर्क विभागाने मंगळवारी दिली.

क प्रभागात धुळ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नसल्याने सहा.आयुक्त तुषार सोनवणे यांच्या पथकाने काल सायंकाळी कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साईं कृष्णा साइटचे बांधकाम बंद केल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली पूर्व येथील टंडन रोडवरील साखरी गणेश सोसायटी (तळ + ३) या इमारतीचे पुनर्विकासासाठी तोडकाम करताना संबंधितांनी धुळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याने सदरचे पाडकाम थांबविण्याची कारवाई ग प्रभागाच्या सहा.आयुक्त सोनम देशमुख यांच्या पथकाने केली असून, त्यांस आदेशाचे पालन करणेबाबत नोटीस बजाविण्यात आली. महापालिका क्षेत्रात बांधकाम साहित्याची वाहतुक करणा-या वाहनांवर वायु प्रदुषण नियंत्रण सूचनांचे पालन करत नसल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेशही जाखड यांनी दिले असून, त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागास कळविण्यात आल्याची माहिती पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली. 
 

Web Title: notice to 25 builders for not implementing dust prevention measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.