चौथा आणि पाचवा मजला अस्तित्वात नसताना तीन मजली इमारतीला नोटीस
By मुरलीधर भवार | Published: April 24, 2023 07:55 PM2023-04-24T19:55:58+5:302023-04-24T19:56:49+5:30
शहराच्या पश्चिम भागातील जोशी बाग परिसरात शेख नावाची इमारत आहे. ही इमारत तीन मजली आहे.
कल्याण- कल्याण डाेंबिवली महापालिकेचे अधिकारी त्यांच्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आत्ता केडीएमसीच्या क प्रभाग क्षेत्रातील अधिका:यांचा एक असा पराक्रम समोर आला आहे. आपल्या जागेवर अनधिकृत बांधकामाची तक्रार करणा:या महिलेलाच तुमच्या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला अनधिकृत असल्याची नोटिस पाठवून अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. मात्र या इमारतीत चौथा आणि पाचवा मजलाच नाही. घटनास्थळी न जाता अधिकारी खुर्चीत बसून नाेटिसा पाठवित असल्याचे यातून उघड झाले आहे.
शहराच्या पश्चिम भागातील जोशी बाग परिसरात शेख नावाची इमारत आहे. ही इमारत तीन मजली आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर एक रुम विकण्यात आला आहे. या रुम मालकाने इमारतीच्या मालकास विश्वासात न घेता इमारतीच्या जागेत एक शौचालय बांधले आहे. या बेकायदा शौचालायची तक्रार शेख कुटंबियांनी महापालिकेस केली आहे. महापालिकेच्या क प्रभागातील अधिका:यांनी बेकायदा शौचालयाच्या विरोधात कारवाई केली नाही. दुसरीकडे शेख इमारतीला धोकादायक असल्याचे सांगत इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला अनधिकृत असल्याची नोटिस पाठवून या संदर्भात अहवाल सादर करा असे सांगितले.
ही नोटिस प्राप्त होताच शेख कुटुंबियांना धक्काच बसला. शेख इमारत ही केवळ तीन मजली आहे. चौथा आणि पाचवा मजला अस्तित्वात नाही. केडीएमसीच्या या भोंगळ कारभाराविषयी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणी आश्चर्य व्यक्त करीत काही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.