महावितरणच्या १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा
By अनिकेत घमंडी | Published: February 28, 2024 04:55 PM2024-02-28T16:55:37+5:302024-02-28T16:57:54+5:30
कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
डोंबिवली: कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालय स्तरावर रविवारी आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन आपापली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
यात कल्याण मंडल एकमधील १३ हजार ८६०, कल्याण मंडल दोनमधील ४५ हजार १५०, वसई मंडलातील ३८ हजार ८४२ आणि पालघर मंडल कार्यालयांतर्गत ३७ हजार ९५४ प्रकरणांचा समावेश आहे. नोटिस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येणार आहेण् संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.