'कल्याण लोकसभेतील मतदारांशी संपर्क करून केंद्र, राज्याच्या योजनांची जनजागृती करा'
By अनिकेत घमंडी | Published: April 6, 2023 06:01 PM2023-04-06T18:01:32+5:302023-04-06T18:01:57+5:30
कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; पक्षाच्या ४३ व्या वर्धापनदिनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद
अनिकेत घमंडी/डोंबिवली
डोंबिवली: लोकसभा निवडणुकीला अवघे वर्ष राहिले असून आता वर्षभर लोकसभा निवडणुकीपर्यन्त भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो नागरिकांशी संपर्क साधून केंद्रातील मोदी तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती द्यावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या ४३व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुरुवारी।केले.
पक्षाच्या कल्याण येथील जिल्हा कार्यालयामध्ये सकाळीच पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ध्वजारोहण केले, त्यानंतर कॅबिनेट मंत्री चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले व जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यावेळी ते बोलत होते. त्यानिमित्ताने त्यांच्या हस्ते पक्षाच्या जुन्या, ज्येष्ठ जाणत्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. जुन्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आज ही पक्षात काम केल्याचा अभिमान वाटतो असेही चव्हाण म्हणाले. त्यांच्याहस्ते माजी जिल्हाध्यक्ष के.आर.जाधव, माजी जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे, माजी नगरसेवक रमाकांत उपाध्ये, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सिताराम कदम, निर्जा मिश्रा, कपिल देव शर्मा राजेंद्र बेहेनवाल, इंदुमती सूर्यवंशी, चंद्रशेखर तांबडे ,सुधा जोशी हेमल रवानी यांसह २५ जुन्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला . त्या सत्कार समारंभ वेळी रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
कांबळे यांनी पेढे वाटून, फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या लोकसभेतील पक्षाच्या सर्व बूथ समित्यांवर स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सर्वाधिक मतदान मिळवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान पक्षाने सुरु केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ७५ हजार घरी जाण्याचा कार्यक्रम संघटनेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे आवाहन कांबळे यांनी।केले. ७८२००७८२०० या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ऍप मार्फत मतदारांपर्यंत पोहचवली जाईल. विविध समाज घटकांमध्ये जनजागृती करून भाजपचा मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्याचे देश, प्रदेश पातळीवरचे नियोजन असल्याचे पवार म्हणाले.