कल्याणमध्ये आता तृतीयपंथींचे सलून; ‘यूएसएआयडी’चे मिळाले आर्थिक बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 10:49 AM2023-04-01T10:49:13+5:302023-04-01T10:49:32+5:30

अमेरिकेचे महावाणिज्यदूत माइक हॅन्की आणि यूएसएआयडीच्या उपमिशन डायरेक्टर कॅरेन क्लिमोव्स्की यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

Now Transgender salons in Kalyan; USAID got financial strength | कल्याणमध्ये आता तृतीयपंथींचे सलून; ‘यूएसएआयडी’चे मिळाले आर्थिक बळ

कल्याणमध्ये आता तृतीयपंथींचे सलून; ‘यूएसएआयडी’चे मिळाले आर्थिक बळ

googlenewsNext

कल्याण : मुंबईपाठाेपाठ ठाणे जिल्ह्यातील पहिले तृतीयपंथींचे अद्ययावत सलून कल्याणमध्ये शुक्रवारी सुरू झाले. आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिवसाचे औचित्य साधून किन्नर अस्मिता असोसिएशनने यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या  (यूएसएआयडी) आर्थिक मदतीतून पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरात सलून सुरू झाले. 

अमेरिकेचे महावाणिज्यदूत माइक हॅन्की आणि यूएसएआयडीच्या उपमिशन डायरेक्टर कॅरेन क्लिमोव्स्की यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाला अर्थसाहाय्य करत समाजातील सर्वात महत्त्वाच्या घटकाला स्वावलंबी होण्यासाठी मदत करत असल्याचे समाधान हॅन्की यांनी व्यक्त केले. यूएसएआयडी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गरजूंना मदतीचा हात देत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिलांनाही घेता येणार लाभ 

महाराष्ट्रातील तृतीयपंथींनी तृतीयपंथींसाठी सुरू केलेले दुसरे सलून पार्लर आहे. यापूर्वी मुंबईतील प्रभादेवी येथे असे सलून सुरू झाले आहे. तृतीयपंथींसाेबतच महिलांनाही येथील सेवेचा लाभ घेता येणार आहे. पुरुषांना प्रवेश नाही. सवलतीत येथे सेवा मिळणार असल्याचा दावाही सिंग यांनी केला.

ठाण्यात १,५०० तृतीयपंथी 

ठाणे जिल्ह्यात जवळपास १५०० तृतीयपंथी राहतात. भीक मागून किंवा शरीरविक्रय करून ते आपली उपजीविका करतात. मात्र, त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मागील २५ वर्षांपासून किन्नर अस्मिता असोसिएशन काम करत आहे. तृतीयपंथींना ब्यूटीपार्लरमध्ये मिळणारी अपमानकारक वागणूक, त्यांना ग्राहक असताना न दिला जाणारा प्रवेश यासारख्या भेदभावांमुळे दुखावलेल्या तृतीयपंथींसाठी हक्काचे ब्यूटीपार्लर असावे, या उद्देशाने हे पार्लर सुरू केल्याचे किन्नर गुरु नीता केणे यांनी सांगितले.

नऊ तृतीयपंथींना दिले प्रशिक्षण

किन्नर अस्मिता असोसिएशनच्या माध्यमातून नऊ तृतीयपंथींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून हे सलून चालवण्यात येणार आहे. सुरुवातीला या कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चाचा भार संस्थेच्या माध्यमातून उचलण्यात येणार आहे, असे संस्थेच्या सदस्या सिमरन सिंग यांनी सांगितले.

Web Title: Now Transgender salons in Kalyan; USAID got financial strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण