आता महिला अग्निशामक कर्मचारी सुद्धा आपत्ती काळात नागरिकांना करणार मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:05 PM2022-07-19T22:05:12+5:302022-07-19T22:05:33+5:30
Kalyan : अग्निशामक महिला कर्मचारी सदयस्थितीत टिटवाळा, आधारवाडी आणि डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहेत.
कल्याण : मुंबई महापालिकेनंतर आता कल्याणडोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलात देखील प्रथमच बाह्य यंत्रणेद्वारे १५ महिला अग्निशामक कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या १५ अग्निशामक महिला कर्मचारी आता आपत्ती काळात नागरिकांच्या मदतीसाठी इतर अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी यांचे समवेत सज्ज राहणार आहेत.
या अग्निशामक महिला कर्मचारी सदयस्थितीत टिटवाळा, आधारवाडी आणि डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहेत. विविध आपत्तीचे प्रसंगी नागरिकांना प्राधान्याने मदत करण्यात महापालिकेचे अग्निशमन पथक नेहमीच अग्रेसर असते. यामध्ये आता महिलांना देखील अग्निशामक या पदावर कार्यरत ठेऊन महापालिकेने महिलांप्रती प्रगतीचे नवे दालन खुले केले आहे.
महापालिकेची आधारवाडी कल्याण पश्चिम, टिटवाळा पूर्व, कल्याण पूर्व, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. डोंबिवलीतील पलावा परिसरातही अग्निशमन विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे.
या अग्निशमन केंद्राचा फायदा आपत्तीचे वेळी नजीकचा ग्रामीण परिसर आणि २७ गावांना होणार आहे. अशी माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे.