रेल्वेच्या तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला भूसंपादनाचा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 01:12 AM2021-02-07T01:12:36+5:302021-02-07T01:12:58+5:30
रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारबरोबर समन्वय साधून काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहारात केली.
डोंबिवली : कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली असल्याने तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांचे काम होती घेण्यात आले आहे. मात्र, ते संथगतीने सुरू आहे. तसेच या कामासाठी भूसंपादनही झाले नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारबरोबर समन्वय साधून काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहारात केली.
कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतपर्यंत तिसऱ्या मार्गाला २०११ मध्ये परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर कल्याण ते आसनगाव आणि कल्याण ते बदलापूर मार्गावर चौथा मार्गही मंजूर करण्यात आला. या परिसराचे वेगाने नागरीकरण होत असून, दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, केवळ दोन मार्ग असल्यामुळे लोकलच्या नव्या फेऱ्या सुरू करण्यास मर्यादा आहेत. त्याचबरोबर लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकल थांबविल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचा नाहक वेळ वाया जातो. यासंदर्भात अनेकदा प्रवाशांनी आंदोलने केली आहेत. प्रवाशांच्या गरजेचा विचार करता कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा मार्गावर तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गाची नितांत गरज आहे. त्यामुळे या मार्गांचे काम लवकर व्हावे, असे पाटील म्हणाले.
केवळ आराखडा तयार
कल्याण-आसनगाव दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गाच्या कामात अजून काहीही प्रगती झालेली नाही. त्यासाठी भूसंपादन संथ सुरू आहे. तर बदलापूर-कर्जत मार्गासाठी भूसंपादनाचा केवळ आराखडा तयार केला. त्यामुळे दोन्ही मार्गाचे काम वेगाने होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारशी समन्वय साधून अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.