राजकीय नेत्यांच्या भेटीने अडथळा, यंत्रणेवर माेठा ताण; नातलगांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 11:56 AM2023-09-24T11:56:30+5:302023-09-24T11:57:54+5:30
सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट : गर्दीने रुग्णालय यंत्रणेवर माेठा ताण
राजेश जाधव
म्हारळ : सेंच्युरी रेयॉन कंपनीत शनिवारी सकाळी टँकरमधील रसायनाचा स्फोट होऊन भीषण अपघात घडल्यानंतर जखमींना उपचारांकरिता सेंच्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बराच वेळ रुग्णांच्या नातलगांना प्रशासनाकडून माहिती दिली जात नसल्याने व राजकीय नेत्यांनी रुग्णांची विचारपूस करण्याकरिता गर्दी केल्याने नातलगांनी तीव्र संताप व्यक्त केला.
स्फोटात मरण पावलेला शैलेश यादव हा उत्तर प्रदेशातील आझमगड येथील रहिवासी असून, कंपनीत हेल्परचे काम करीत होता. जखमी झालेल्यांमधील सागर झाल्टे (वय ४४) वाहन चालक पंडित मोरे (४३) हंसराज सरोज (५२) मदतनीस आणि प्रकाश आनंद निकम (३४) या चौघांवर उपचार सुरू असून, अमित भरूनिते याच्यावर कल्याण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे यशवंत सगळे यांनी दिली.
सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी घटनास्थळी पोहोचून त्वरित परिस्थिती हाताळली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुल पगारे यांनी सांगितले की, सकाळी टँकरमध्ये रसायन भरण्यासाठी टँकरची तपासणी सुरू असताना टँकरचा स्फोट झाला. मात्र, कंपनीने रसायन भरण्याच्या प्रक्रियेला दुजोरा दिलेला नाही. अपघातात शैलेश यादव आणि अन्य एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. वाशिम भातसई येथील कामगार अनंता जाधव ऊर्फ डोंगरे हा बेपत्ता आहेत, असे भाऊ बाळकृष्ण जाधव यांनी सांगितले. जखमी व मृतांच्या नातलगांनी कंपनीत प्रवेश मिळत नाही हे दिसल्यावर रुग्णालय गाठले. आपल्या माणसाला जो तो शोधत होता. त्यामुळे नातलगांना आवरताना रुग्णालय कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. घटनेच्या तीन तासांनंतर काही माहिती मिळत नसल्याची तक्रार रुग्णालयात भेट देण्यात आलेले आमदार रोहित पवार यांच्याकडे नातलगांनी केली.
जखमींचे नातलग नाराज
रुग्णालयात स्थानिक लोकप्रतिनिधींनी धाव घेतल्याने रुग्णांवर उपचार करायचे की, राजकीय नेत्यांना माहिती द्यायची, या पेचात सेंच्युरी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी सापडले होते. जखमींना उपचार मिळण्यात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीमुळे खंड पडतोय हे पाहून जखमींचे नातलग नाराज झाले होते.
नोकरी व आर्थिक मदत
स्फोटात मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एकाला नोकरी देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली. स्फोटात शैलेश यादव व राजेश श्रीवास्तव या कामगारांचा मृत्यू झाला. एक जण बेपत्ता आहे.
लेखी आश्वासनाखेरीज शव स्वीकारण्यास नकार
स्फोटात बेपत्ता असलेल्या अनंता जाधव यांच्या नातेवाइकांनी कंपनीने मदतीचे लिखित आश्वासन दिल्याशिवाय आम्ही शव स्वीकारणार नसल्याचा इशारा दिल्याने काही काळ गोंधळ उडला होता.