मध्य रेल्वेवर मालगाडीचे डबे इंजिनापासून झाले वेगळे, लोकल सेवा विस्कळीत
By अनिकेत घमंडी | Published: August 30, 2023 08:45 AM2023-08-30T08:45:22+5:302023-08-30T08:45:47+5:30
नेरळ-वांगणी या स्थानकांदरम्यान घडली घटना
अनिकेत घमंडी, डोंबिवली: मालगाडीचे डबे इंजिनापासून वेगळे झाल्याची घटना नेरळ वांगणी मार्गावर बुधवारी सकाळी ७.५४ च्या सुमारास घडली. त्यामुळे कल्याण ते कर्जत, बदलापूर मार्गवरील लोकल सेवा विस्कळीत झाली, वेग मंदवला होता. मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवाजी मानसपुरे यांनी गुड्स ट्रेन अनकपल झाल्याची माहिती माध्यमांना दिली. जसे डबे पुन्हा जोडले जातील, तसे तो मार्ग सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून डबे लवकरच जोडण्यात येतील असे सांगण्यात आले.
बुधवारी रक्षाबंधन असल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून बदलापूर, कल्याण आणि कर्जत नेरळ वांगणी दरम्यान प्रवासी ताटकळले आहेत. लवकरात लवकर समस्या।सुटावी आणि प्रवास सूरु व्हावा।अशी मागणी प्रवाशांनी केली. मंगळवारी कल्याण मार्गावर फलाट ६/७ मद्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता, त्यामुळे समस्या झाली होती, तेव्हाही सकाळी पहिल्या सत्रात बिघाड झाल्याने रेल्वे।प्रवसी, चाकरमान्यांचे हाल झाले होते, त्यामुळे रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्यांना बसत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त झाली. कुटुंबासह निघालेल्या नागरिकांचे मालगाडीचे डबे वेगळे झाल्याच्या अपघात घटनेमुळे ठिकठिकाणी हाल झाले. अखेर सकाळी ८.१८ वाजेच्या सुमारास पुन्हा डबे जोडण्यात आले आणि मालगाडी मुंबईकडे रवाना झाली, त्यानंतर हळूहळू तो सेक्शन क्लिअर झाला वाहतूक पूर्वपदावर आल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले.