कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; जन आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक
By मुरलीधर भवार | Published: October 29, 2022 06:34 PM2022-10-29T18:34:54+5:302022-10-29T18:35:21+5:30
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ५० व्या दिवशी मोठे जन आंदोलन उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे.
कल्याण : भिवंडी- कल्याण-शिळफाटा, राज्य महामार्ग क्रमांक ४० या मार्गावरील रस्ते बाधित शेतकऱ्यांना तसेच भूमिपुत्र जमीन मालकांना मोबदला मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षिय युवा मोर्चा व कल्याण-शिळफाटा रस्ता बाधित शेतकऱ्यांचे आयोजित बेमुदत धरणे आंदोलन अद्याप सुरू आहे. या आंदोलनाचा आज आज ४० वा दिवस आहे. या ४० दिवसात राज्य शासनाने जिल्हाधिकारी ठाणे यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या अहवालाबाबत केवळ बैठका झाल्या. हा अहवाल पूर्ण न झाल्यामुळे राज्य शासनाला मोबदल्याबाबत भूमिका जाहीर करता आली नाही.
मागील चार वर्षांपासून भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्यातील भूसंपादन व मोबदल्याबाबत गठीत समितीच्या अहवालास लागलेला विलंब व मागील ४० दिवसांच्या शेतकरी आंदोलनाची राज्य शासनाने दखल न घेतल्यामुळे येथील प्रकल्प बाधित शेतकरी भूमिपूत्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या अनुषंगाने आज आंदोलन ठिकाणी बैठक संपन्न झाली. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या ५० व्या दिवशी संविधानिक मार्गाने खूप मोठे जन आंदोलन करण्याची मागणी रस्ता बाधितांकडून आज करण्यात आली.
आंदोलनाच्या ४० व्या दिवशी सुद्धा कल्याण-शिळफाटा रस्त्यातील बाधित जमिनीच्या मोबदल्याबाबत राज्य शासनाने निर्णायक भूमिका न घेतल्यामुळे रस्ता बाधितांनी ५० व्या दिवशी खूप मोठे जन आंदोलन उभे करण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी आंदोलनाच्या ४५ व्या दिवशी गुरूवार ता.०३ ऑक्टोबर या आंदोलनासाठी जाहिर पाठींबा दिलेल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या नेते पुढारींना निमंत्रीत करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील जन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यामध्ये दि. बा. पाटील सर्व पक्षिय नामकरण समिती, आगरी सेना यासह इतर वेगवेगळ्या ३० ते ४० स्थानिक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे.असे सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितले.