बुध्द जयंतीच्या मंगलमय पहाटे कल्याण पूर्वेत निघाला कँडल मार्च
By अनिकेत घमंडी | Published: May 23, 2024 11:55 AM2024-05-23T11:55:54+5:302024-05-23T11:57:02+5:30
जागृती मंडळाचे आयोजन
अनिकेत घमंडी, कल्याण : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती दिनी गुरुवारी कल्याण पूर्वेतील जागृती मंडळ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते .
गेली ४० वर्षाहून अधिक काळ कल्याण पूर्वेत सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेल्या जागृती मंडळाच्या विद्यमाने इ . सन . १९८४ पासून बुद्ध जयंती दिनी पहाटेच्या मंगलमय वातावरणा कँडल मार्चचे आयोजन करण्यात येत असते या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या कँडल मार्च च्या प्रारंभी जागृती मंडळाच्या कार्यालयात पहाटे बुद्ध धम्म वंदना तसेच त्रिसरण पंचशिलेचे पठण करण्यात आले . या नंतर या कँडल मार्च चा प्रारंभ करण्यात आला . या कँडल मार्चचे नेतृत्व ७१ वर्षाच्या जेष्ठ उपासिका अनुसया काशिनाथ अहिरे यांनी हातात तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचा पंचशील ध्वज घेवून केले .
हा कँडल मार्च तिसगांव रोड मार्ग पुढे पुणे लिंक रोडने डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी नेण्यात आला . स्मारकावरील महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर बुध्द वंदना घेण्यात येवून महामानवाला वंदन करण्यात आले . या नंतर हा कॅडल मार्च काटेमानिवली चौकातून पुढे सिध्दार्थ नगर येथे नेण्यात आला . सिध्दार्थ नगर येथील बुद्ध विहारात त्रिसण पंचशील ग्रहण केल्या नंतर या ठिकाणी कॅडल मार्चची समाप्ती खिर दानाने करण्यात आली .
या कँडल मार्च मध्ये आयु . पी. आर. माटे, बाबा थुल, अनिल जांभूळकर आदी जागृती मंडळाचे पदाधिकारी, पंचशिल धम्म प्रबोधन भगिनी मंडळ कल्याण (पूर्व) च्या उपासिका तसेच समाजातील उपासक - उपासिका सहभागी झाल्या होत्या .