अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनानिमित्त केडीएमसी प्रशासनासह, पोलिस यंत्रणा सज्ज
By प्रशांत माने | Published: September 27, 2023 06:52 PM2023-09-27T18:52:52+5:302023-09-27T18:53:15+5:30
वाहतूकीबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन वाहनचालकांसह गणेशभक्तांनी करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
कल्याण: अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्या गुरूवारी कल्याण-डोंबिवली शहरातील १७३ सार्वजनिक मंडळांचे आणि १३ हजार ६५ घरगुती अशा १३ हजार २३८ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जन प्रक्रिया सुलभ व्हावी, विसर्जन मिरवणूकीदरम्यान वाहतूककोंडी होऊ नये या दृष्टीकोनातून केडीएमसी, वाहतूक आणि शहर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील गणेशघाट विसर्जनासाठी सुसज्ज ठेवले असताना कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी आदी उपक्रमही केडीएमसीकडून राबविले जाणार आहेत.
कल्याण डोंबिवलीतील विसर्जनस्थळांच्या ठिकाणी एकुण २ हजार ६७० हॅलोजन बसविण्यात आले आहेत. त्यासाठी एकुण ७२ जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. ९४ ठिकाणी टॉवर लायटिंग व्यवस्था करण्याबरोबरच ३४ ठिकाणी एकुण १७२ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. निर्माल्य संकलन करण्यासाठी कल्याणमध्ये दोन डंपर आणि डोंबिवलीमध्ये दोन डंपर्सचे (निर्माल्य रथ) नियोजन करण्यात आले आहे.
ड्रोनद्वारे गर्दीवर नजर
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ११३ पोलिस अधिकारी, ५४७ पोलिस कर्मचारी, १६८ महिला पोलिस कर्मचारी , १०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकडया विसर्जन कालावधी दरम्यान दोन्ही शहरात तैनात राहणार आहेत. वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्याबरोबरच कल्याण शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग एकदिशा करण्यात आले आहेत. वाहतूकीबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन वाहनचालकांसह गणेशभक्तांनी करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.