श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष
By अनिकेत घमंडी | Published: January 17, 2024 04:25 PM2024-01-17T16:25:35+5:302024-01-17T16:35:07+5:30
अयोध्येत उभे राहत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ संपूर्ण मतदारसंघात धावत असून या महोत्सवाचे हे खास आकर्षण ठरत आहे.
डोंबिवली: देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मंदिर सोहळ्यासाठी सर्वत्र उत्साहात तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रभू श्रीराम नामाचा जयघोष घुमणार आहे. तर अयोध्येत उभे राहत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ संपूर्ण मतदारसंघात धावत असून या महोत्सवाचे हे खास आकर्षण ठरत आहे.
अयोध्येच्या सोहळ्याला सर्वांना प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा आणि त्यात सहभागी होता यावे यासाठी अनेक सांस्कृतिक - आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द गायिका गीतांजली राय यांच्या संगीत कार्यक्रमाचे २० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. तर सुप्रसिध्द गायक पवन सिंग यांच्या संगीत संध्येचे २१ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पूर्व येथील गुण गोपाल मैदान येथे सायंकाळी ६ नंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्गज अभिनेते सादर करणार ''रामायण'' ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक पुनित इस्सार आणि सिद्धांत इस्सार दिग्दर्शित आणि लिखित जय श्रीराम रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना भव्य स्वरूपात रामायण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ नंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कल्याण पूर्व येथील गुण गोपाल मैदान, चक्की नाका येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असणाऱ्या गुण गोपाल मैदानात श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. १९ ते २२ जानेवारीपर्यंत ती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. प्रभू श्रीरामाच्या भव्य प्रतिकृतीसोबतच अयोध्येतील राम मंदिराची सुंदर प्रतिकृती असलेला सुंदर असा रथ साकारण्यात आला आहे.
प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या दिनापर्यंत हा रथ मतदारसंघात धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे यांच्या हस्ते या रथाचे रविवारी अनावरण करण्यात आले. ५० हजार पुस्तकातून साकारणार श्रीराम मंदिर... डोंबिवली येथील फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून वैकुंठवासी परमपूज्य सावळाराम महाराज संकुलात बंदिस्त क्रिडासंकुलात रामांचे मंदिर उभारण्यात येणार आहे. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका गुण गोपाल मैदानात २० ते २२जानेवारी दरम्यान श्रीराम नाम जपयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.