मंगळवारी अग्नीवीरांची पहिली तुकडी भारतीय सैन्यात होणार दाखल!
By प्रशांत माने | Published: March 26, 2023 05:14 PM2023-03-26T17:14:47+5:302023-03-26T17:14:57+5:30
या अग्नीवीरांच्या तुकडीला नौदलप्रमुखांसह महावीरचक्र विजेते मार्गदर्शन करणार आहेत.
डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संकल्पनेतुन अग्निपथ या योजनेंतर्गत तयार झालेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी प्रशिक्षण पुर्ण करून मंगळवारी भारतीय सैन्य दलात दाखल होत आहे. या अग्नीवीरांच्या तुकडीला नौदलप्रमुखांसह महावीरचक्र विजेते मार्गदर्शन करणार आहेत. विशेष बाब म्हणजे डोंबिवलीकर असलेले माजी नौदल सैनिक आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गजानन जगन्नाथ माने यांना देखील या कार्यक्रमाला अग्नीवर तुकडीला मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले गेले आहे.
मंगळवारी २८ मार्चला आय एन एस (इंडियन नेव्हल शीप) चिलका ओरीसा येथे हा कार्यक्रम होणार आहे. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यातील सैनिकी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात दाखल होणा-या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीत २६०० पुरूष आणि २७८ महिला सैनिकांचा समावेश आहे. या पहिल्या तुकडीला नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार हे संबोधित करणार आहेत. यावेळी निवृत्तीनंतर देखील देशसेवेसाठी महत्वपूर्ण काम करणा-या महावीरचक्र विजेत्यांसारख्या अन्य विभूतींना अग्नीवीरांना मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमाला आमंत्रित केले आहे. यात गजाजन माने यांचाही समावेश आहे.
५ एप्रिलला माने पद्मश्रीने होणार सन्मानित
नौदलातून निवृत्त झाल्यावरही सैनिकाच्या कर्तव्याची जबाबदारी लक्षात ठेवून १९८५ पासून अविरतपणे कुष्ठरूग्ण सेवा करणा-या गजानन मानेंच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात दरबार हॉलमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. ठाणो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील ७० वर्षातील सन्मानित होणारे माने हे एकमेव डोंबिवलीकर आहेत. शनिवारी त्यांना डोंबिवलीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘डोंबिवलीकर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.