अंबरनाथमधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला एका दिवसात वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 06:13 PM2021-04-24T18:13:48+5:302021-04-24T18:14:42+5:30
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कल्याण परिमंडलाची तत्परता
कल्याण - राज्यात सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात अडथळे येत आहेत. ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी ऑक्सिजन निर्मिती कारखान्यांना नवीन वीजजोडणी तसेच क्षमतावाढीसाठी वाढीव भार तातडीने देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यानुसार महावितरणच्या कल्याण परिमंडलात अंबरनाथ एमआयडीसीतील मॉडर्न गॅस इंडस्ट्रीजला २४ तासात आवश्यक सुविधा उभारून ५० एचपी क्षमतेची नवीन औद्योगिक वीजजोडणी देण्यात आली. यातून कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिका व परिसरातील कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन मिळण्यास मोलाची मदत मिळणार आहे.
अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील मॉडर्न गॅस इंडस्ट्रीजकडून ऑक्सिजन निर्मितीच्या क्षमतावाढीसाठी ५० एचपी क्षमतेच्या नवीन वीजजोडणीची मागणी करण्यात आली होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या सूचनांप्रमाणे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी तातडीने वीजजोड देण्याबाबत नियोजन केले. नवीन वीजजोडणीसाठी १५० मीटर उच्चदाब व ३० मीटर लघुदाब वीजवाहिनी तसेच १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्र उभारणीचे काम करणे आवश्यक होते. शुक्रवारी (२३ एप्रिल) सकाळपासून युद्धपातळीवर काम सुरू करून रात्री दहा वाजता नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली. तातडीने वीजजोडणी मिळाल्याने मॉडर्न गॅस इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाने महावितरणचे आभार मानले आहेत.
मुख्य अभियंता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कार्यकारी अभियंता अशोक सावंत, उप कार्यकारी अभियंता कलंत्री, सहायक अभियंता सुदर्शन कांबळे आणी त्यांच्या टीमने ही कामगिरी केली.