दोघांच्या हत्येप्रकरणी एकाला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: December 12, 2023 08:46 PM2023-12-12T20:46:43+5:302023-12-12T20:47:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघा चुलत भावांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपी अनिल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघा चुलत भावांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपी अनिल मेघदास पटेनिया याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जून २०१६ रोजी म्हारळ गावाच्या हद्दीत मदन सुनार (३०, रा. उल्हासनगर) आणि त्याच्या चुलत भाऊ राजू सुनार (२५, रा. म्हारळ) याच्याकडे अनिलने दारूसाठी पैसे मागितले. मात्र, त्या दोघांनी पैसे देण्यास नकार दिला याच रागातून अनिलने धारदार शस्त्राने वार करून दोघा भावांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक व्यंकटेश आंधळे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी अनिल पटेनिया याला अटक केली. त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील योगेंद्र पाटील आणि रचना भोईर यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे व कोर्ट ड्युटी महिला पोलीस शिपाई अर्चना गोपाळे यांनी मदत केली.