वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; दोषींवर कारवाईची मागणी
By प्रशांत माने | Published: June 14, 2023 05:34 PM2023-06-14T17:34:38+5:302023-06-14T17:34:46+5:30
महावितरण आणि केडीएमसी यांच्या हलगर्जीपणामुळे मोरे यांचा मृत्यू ओढावल्याचा आरोप कुटुंबासह परिसरातील नागरीकांनी केला.
डोंबिवली: येथील पश्चिमेकडील शास्त्रीनगर हॉस्पिटलसमोरील कोपररोड, सिद्धार्थनगर परिसरात राहणारे मांगीलाल मोरे (वय ४१) यांचा वीजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. महावितरण आणि केडीएमसी यांच्या हलगर्जीपणामुळे मोरे यांचा मृत्यू ओढावल्याचा आरोप कुटुंबासह परिसरातील नागरीकांनी केला.
दरम्यान जोपर्यंत संबंधित अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत बुधवारी नागरीकांनी तब्बल अडीच तास रास्ता रोको केला. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि सरकारी अधिका-यांनी चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोरे हे कुटुंबासमवेत राहत होते. रंगकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रात्रीच्या सुमारास ते आपल्या घरात जात असतानाच त्यांना विदयुत खांबाचा जोरदार धक्का बसला आणी त्यात त्यांचा मृत्यू झाला. अन्य दोघांना देखील वीजेचा धक्का बसला पण ते बचावले. दरम्यान विदयुत खांबावरील वायरी लोंबकळत असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याप्रकरणी सिद्धार्थनगरमधील नागरीकांनी रास्ता रोको करीत महावितरण आणी महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविला. मोरे यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावळी करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. यात वाहतूकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती.
मोरे यांच्या राहत्या घराजवळ महावितरणचा विद्युत खांब आणी केडीएमसीचा स्ट्रीट लाईटचा खांब आजुबाजुला आहे. महावितरणाच्या विद्युत खांबावर मोठया प्रमाणात वायरी लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या खांबांमधून विदयुत प्रवाह आजुबाजुला पसरला की मनपाच्या स्ट्रीट लाईटच्या खांबातून याबाबतचे गुढ कायम राहीले आहे. दरम्यान शासनाच्या विदयुत निरिक्षकांच्या वतीने याची चौकशी केली जाईल आणि त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करू असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.