लोकल पकडण्यासाठी चालत जाणाऱ्या तरुणीला माथेफिरुने मारली मिठी; कल्याणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 03:11 PM2023-05-22T15:11:05+5:302023-05-22T16:00:04+5:30
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ले, माथेफिरूंचा वावर वाढला असून याआधी देखील अनेक घटना घडल्या आहेत.
कल्याण: रेल्वेने कामावर जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला एका माथेफीरूने मिठी मारल्याची संतापजनक घटना कल्याण रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर घडली. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा-ओरड करताच प्रवाशांनी या माथेफिरूला पकडून चोप दिला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माथेफिरूचा शोध घेत त्याला ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ले, माथेफिरूंचा वावर वाढला असून याआधी देखील अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घटनांवर आळा घालण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांसमोर उभे आहे. पीडित तरुणी कामावर जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आली. ट्रेन पकडण्यासाठी ती पादचारी पुलावरून चालत जात असताना अचानक एका माथेफिरूने तिला मिठी मारली. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा ओरड केला. आजूबाजूच्या प्रवाशांनी या माथेफिरूला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे घाबरलेली तरुणी त्या ठिकाणाहून निघून गेली. मात्र, घटनेबाबत काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे या सातत्याने रेल्वे पोलीस व आरपीएफला या घटनेची माहिती देत पाठपुरावा करत होत्या. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी ४ पथके नेमून सीसीटीव्ही आधारे या माथेफिरूचा शोध सुरू केला. या माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत या माथेफिरूला दुखापत झाली असून त्याच्यावर कल्याणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.