तुमची एक चूक पडू शकते महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:45 AM2021-01-08T01:45:29+5:302021-01-08T01:45:35+5:30
पोलिसांची जनजागृती गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांतून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डाेंबिवली : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन डोंबिवली पोलिसांतर्फे केले जात आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रेझिंग डे कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्रलोभनांना बळी पडू नका, आपली एक चूक, पडू शकते महाग,’ अशा सावधानता बाळगण्याच्या सूचना करताना घरोघरी पत्रके वाटून, शहरातील चौकांमध्ये होर्डिंग्जद्वारे जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांतून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल, इंटरनेटचा आधार घेऊन भामट्यांकडून सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे उच्च शिक्षितांनाही लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्षभरात असे ३० गुन्हे घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांडभोर यांनी नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले आहे.
सायबर गुन्ह्यांबाबतची जनजागृती अधिक व्यापक होण्यासाठी शहरातील ५० ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात येणार आहेत.
ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्कतेच्या सूचनाही नागरिकांना केल्या जाणार आहेत. खातेदारांची होत असलेली फसवणूक पाहता बँकांनीही अधिकाधिक जागरूकता करणे गरजेचे असल्याकडेही सांडभोर यांनी लक्ष वेधले.
अशी घ्या खबरदारी
अनोळखी व्यक्तीने कोणतेही प्रलोभन दाखविले तरी डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका. फेसबुक, इन्स्टाग्रामवर मित्र-मैत्रिणींकडून येणाऱ्या संवेदनशील संदेशाची खात्री करा, अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, लॉटरी लागली आहे, नोकरी, मोबाइल कंपनीचे टॉवर लावण्यासाठी अशी प्रलोभने देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगून प्रलोभन दाखविणाऱ्यांना बळी पडू नका, अशा सूचना सांडभोर यांनी केल्या.