केडीएमसीच्या मोहिली उंदचन केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
By मुरलीधर भवार | Published: January 19, 2024 06:34 PM2024-01-19T18:34:23+5:302024-01-19T18:34:40+5:30
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून कल्याण डोंबिवली महापालिका माेहिली उंदचन केंद्र बांधणार आहे.
कल्याण-केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून कल्याण डोंबिवली महापालिका माेहिली उंदचन केंद्र बांधणार आहे. या केंद्राचे ऑनलाईन भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. दृश्यप्रणाली द्वारे हा साेहळा कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात नागरीकांना पाहता आला. या ठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमृत योजने अंतर्गत मोहिली येथे २७५ दश लक्ष लिटर क्षमतेच्या उदंचन केंद्र बांधले जाणार आहे. त्यासाठी ७७ कोटी ५८ लाख रुपये खर्च होणार आहे. महापालिका हद्दीत १० नवे जलकुंभ बांधले जाणार आहे. त्याकरीता ४८ कोटी ४५ लाख रुपये, गौरीपाडा येथे ९५ दश लक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे.
त्यासाठी १५२ कोटी ६२ लाखाचा खर्च होणार आहे. नव्याने विकसीत होत असलेल्या भागात जलवितरण व्यवस्थेकरीता जलवाहिन्या टाकण्यासाठी २४ कोटी ४७ लाखाचा खर्च केला जाणार आहे. ही सर्व कामे ३०३ कोटी १३ लाख रुपये खर्चाची आहेत. महापालिका हद्दीत सध्या २२ लाख लोकसंख्या आहे. भविष्यातील लोकसंख्येची वाढ लक्षात घेता. पाण्याची गरज वाढणार आहे. मोहने उदंचन केंद्र ४० वर्षे जुने आहे. या नव्या केंद्रामुळे मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल दुरुस्तीवर आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या शुद्दीकरणावर होत असलेल्या वर्षाकाठीचा १ कोटी रुपये खर्चाची बचत होणार आहे.