कल्याण डोंबिवली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन
By मुरलीधर भवार | Published: March 1, 2024 06:37 PM2024-03-01T18:37:46+5:302024-03-01T18:38:10+5:30
लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजनाच्या कामाची लगबग सुरु झाली आहे.
कल्याण- लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजनाच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. ३ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन केले जाणार आहे. डोंबिवली पूर्वेतील सुतिका गृहाच्या जागेत नव्या सुतिकागृहाची इमारत आणि कॅन्सर रुग्णालय रुग्णालय पीपीपी तत्वावर उभारले जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया रावबून त्यासाठी कंत्राटदार ठरविण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन केले जाणार आहे. डोंबिवली पश्चिमेत उभारले जाणारे फिश मार्केट, आयरे गावातील महाराष्ट्र भूषण दादासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमीजपून केले जाणार आहे.
याशिवाय शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र व नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि सुनिलनगर येथील अभ्यासिकेचे उद्घाटन केले जाणार आहे. माझी मिळकत माझी आकारणी" योजनेचे शुभारंभ कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथील ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरुप डॉ.नानासाहेब धर्माधिकारी भाजी मंडईचे उद्घाटन, उंबर्डे येथील वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन केले जाणार आहे. लोकार्पण आणि भूमीपूजन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. दुपारी २ वाजता प्रिमिअर ग्राऊंडवर शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, आयुक्त इंदूराणी जाखड, प्रांत अधिकारी विश्वास गुजर, नायब तहसीलदार रिताली परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महापालिका हद्दीत २९ जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या ४२ शिबीरात सुमारे २२ हजार५४ लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेतला. आता ३ मार्चला प्रीमिअर ग्राऊंडवर होणाऱ्या शासन आपल्या दारी उपक्रमास ही लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त जाखड यांनी यावेळी केले.