मार्चमध्ये १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा; वीजबिल भरा ऑनलाईन महावितरणचे आवाहन
By अनिकेत घमंडी | Published: March 28, 2023 06:16 PM2023-03-28T18:16:21+5:302023-03-28T18:16:48+5:30
महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे.
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे. सुरू आर्थिक वर्षातील वीजबिलाचे १३८ कोटी रुपये अजूनही वसूल होणे बाकी आहेत. ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सुरक्षित असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
पुढील तीन दिवसांत अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या संकेतस्थळ आणि ग्राहकांसाठीच्या मोबाईल अॅपवर सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील वीजबिले पाहण्यासह ते भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट ॲपच्या माध्यमातून सुलभ व सुरक्षितपणे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा आहे.
ही सुविधा नि:शुल्क असून ऑनलाईन पेमेंटवर वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते असे महावीतरणने जाहीर।केले. कल्याण मंडल एकमध्ये (कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली) ४ लाख ३२ हजार ६७२ ग्राहकांनी ६७ कोटी ५३ लाख रुपये ऑनलाईन भरले असून १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. कल्याण मंडल दोनमधील (उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड) ३ लाख ९१ हजार ७५९ ग्राहकांनी ७१ कोटी ४६ लाख भरले असून ७१ कोटी ८१ लाखांची थकबाकी आहे.