कॅनडात असलेल्या जोडप्याचा डोंबिवलीहुन ऑनलाइन विवाह संपन्न, अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 03:10 PM2021-06-28T15:10:48+5:302021-06-28T15:18:39+5:30
जोडप्याच्या नातेवाईकांनी युट्युब आणि फेसबुक पेजच्या लिंकद्वारे लग्नाला उपस्थिती लावली.
कोरोना संकट आणि त्यामुळे लागू झालेल्या बंधनामुळे अनेकांचे विवाह सोहळे रखडलेत. डोंबिवलीमध्ये मात्र एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली आहे. कारण हा विवाह सोहळा अनोख्या पद्धतीनं पार पडलाय. या लग्नात वधू - वर चक्क सात समुद्रा पार कॅनडाला होते. मात्र वराच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजीच्या मदतीने व मोजक्या नातेवाईकांच्या ऑनलाइनपद्धतीने आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सोहळा लावून दिला. मंगलाष्टका व सर्व विधी देखील ऑनलाईन पद्धतीनं पार पडले. इतकच नाही तर अक्षताही ऑनलाईन पडल्या. जोडप्याच्या नातेवाईकांनी युट्युब आणि फेसबुक पेजच्या लिंकद्वारे लग्नाला उपस्थिती लावली.
लग्न होतं डोंबिवली पुर्वेकडील भोपर गाव परिसरात राहणाऱ्या डॉ. हिरामण चौधरी यांच्या मुलाचं .लहानाचा मोठा डोंबिवली मध्ये झालेल्या भूषणने सात वर्षा पूर्वी उच्चशिक्षणासाठी कॅनडा येथे जाण्याचा निर्णय घेतला .सात वर्षा पूर्वी भूषण कॅनडा ला गेला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला तेथेच नोकरी लागली व नोकरीमुळे तो कॅनडात स्थायिक झाला. याच दरम्यान त्याचे हरदीप कौर या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही आपल्या कुटुंबाला विवाहाबद्दल इच्छा बोलून दाखवली.
चौधरी व कौर कुटुंबाने देखील या दोघांना विवाहाची परवानगी दिली मात्र 2020 पासून कोरोनामुळे त्यांना भारतात येता येत नव्हते तर त्यांच्या कुटुंबियांना कॅनडा जाता येत नव्हते .फोनवर लग्नाबद्दल बोलणी व्हायची मात्र कोरोणा ,त्यामुळे लागलेला लोकडाऊन व लोकडाऊन मधील बंधने यामुळे दोन वर्षांपासून तारीख निश्चित होत नव्हती .अखेर या दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांचा ऑनलाइन विवाह करण्याचं ठरवलं .त्यानुसार चौधरी व कौर कुटुंबाने तयारी सुरू केली.
लग्नासाठी लागणारे सर्व सामान कुरियर च्या माध्यमातून भूषणला कॅनडा येथे घरपोच करण्यात आलं. त्यानंतर ठरलेल्या मुहूर्तावर चौधरी कुटुंबाच्या डोंबिवली येथील घरी भटजी आले .विवाह ऑनलाइन होणार असल्यानं नातेवाईकाची गर्दी नव्हती .भटजीनी कॅनडा येथे असलेल्या भुशन व हरदीप याना ऑनलाइन लाईव्ह व्हिडियोच्या माध्यमातून लग्नाचे विधी सांगत त्या प्रमाणे ते करवून घेतले व अखेर कॅनडा येथे राहत असलेल्या भूषण व हरदीपचा डोंबिवली येथून ऑनलाईन विवाह संपन्न झाला.यावेळी या विवाह सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावलेल्या नातेवाइकांनी व चौधरी कुटुंबाच्या मित्रपरिवाराने नववधू वर आला ऑनलाइनच आशीर्वाद दिले . सध्या या एकालग्नाच्या अनोख्या पद्धतीची चर्चा सर्वत्र सुरू असून कोरोना काळात अशाच पद्धतीने विवाह सोहळा करण्याचे आवाहन चौधरी यांनी केलं.