एनआरसी वसाहत पाडकामाला पुन्हा विरोध; पाेलिसांसाेबत कामगारांची झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:57 PM2021-02-20T23:57:03+5:302021-02-20T23:57:15+5:30
पाेलिसांसाेबत कामगारांची झटापट : सहा जणांना घेतले ताब्यात
कल्याण : आंबिवली मोहनेनजीकच्या एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. त्याला शुक्रवारी पुन्हा कामगारांनी विरोध केला. यावेळी काही महिलांनी रस्त्यात लोळण घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारवाईस विरोध करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता.
एनआरसी कंपनी २००९ पासून बंद आहे. विविध कामगार संघटनांनी मिळून कामगारांची थकीत देण्याचा दावा केला आहे. थकीत देणी जवळपास दाेन हजार ५०० कोटी इतकी आहे. या कंपनीची जागा कंपनी व्यवस्थापनाने अदानी ग्रुपला दिल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी व अदानी ग्रुप यांच्यातील कराराची वाच्यता व्यवस्थापनाकडून केली जात नाही. कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कामगारांच्या वसाहतीतील घरे पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्याला कामगारांनी वारंवार विरोध
केला आहे.
आजही कामगारांची घरे पाडण्याचे काम जेसीबी व पोकलेन लावून सुरू असताना ३०० महिला-पुरुषांनी मिळून कारवाईस विरोध केला. यावेळी पोलीस व कामगारांमध्ये झटापट झाली. एनआरसी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी उदय चौधरी यांच्यासह भीमराव डोळस, अशोक नलावडे, सुभाष पाटील, मच्छिंद्र दवते, भूपेंद्र पंत, अजरून पाटील आदींनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांची सुटका केली.