बार, हॉटेल -रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश; केडीएमसीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:33 PM2021-03-23T16:33:56+5:302021-03-23T17:56:54+5:30
हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून येथे काम करणाऱ्या एका जरी कर्मचा-याला कोरोनाबाधित असल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो.
कल्याण: कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून 600 च्या वर कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर कल्याण मधील डी मार्ट मध्ये काम करणारे सहा कर्मचा-यांचा अहवाल कोरोनां पॉझिटिव्ह आल्यावर प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने कोवीड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आलंय. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून येथे काम करणाऱ्या एका जरी कर्मचा-याला कोरोनाबाधित असल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. यावर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून (22 मार्च ) पुढील 7 दिवसांच्या आत ही चाचणी करणे बंधनकारक असून त्याचा अहवाल moh.kdmc@gmail.com या ईमेलवर पाठवायचा आहे. सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारला भेट देऊन याबाबत खातरजमा करणे आवश्यक असून याचे पालन न करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.