"...अन्यथा नागरिकच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील दगड पालिकेच्या दिशेने भिरकावतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:11 PM2021-07-24T16:11:56+5:302021-07-24T16:13:08+5:30
Dombivli : कोपर पुलामुळे पूर्व पश्चिम वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी व्हावी. संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.
डोंबिवली: महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. डोंबिवली-कल्याणकर नागरिकांचा अंत पाहू नका, लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करा, नाहीतर हेच रस्त्यावर पडलेले सुटे दगड नागरिकांच्या हातात असतील आणि महापालिकेच्या दिशेने भिरकावले जातील. महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे तो दिवसही दूर नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना शनिवारी खड्ड्यांसदर्भात दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
खड्डेमय रस्त्यांसंदर्भात आयुक्तांना माहीत असेलच पण त्यांच्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कधी होईल? आणि ते स्वतःहून उपाययोजना करतील याची आजपर्यंत वाट पाहत होते का? माझा अपेक्षाभंग झाला नाही, कारण ते आपणहून हे काम करतील अशी माझी अपेक्षाच नव्हती त्यांनी ते केलेही नाही. यावरून आपले अधिकारी आणि प्रशासक म्हणून आपण पुन्हा एकदा नगर सुविधा क्षेत्रात नापास झाला आहात, अशी खरमरीत टीका चव्हाण यांनी केली.
महापालिका क्षेत्रात पडणारा पाऊस आणि रस्त्यांवर पडणारे खड्डे प्रशासनास चांगलाच परिचयाचा आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध असते. मास्टेक कार्पेटसारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणे सहज शक्य असताना आणि खड्ड्यांसाठी बजेट तरतूद देखील असताना पावसाळ्यापूर्वी निविदा काढून खड्डे का भरले नाहीत? रस्त्यांची झालेली चाळण यासाठी आपले सुस्त प्रशासन आणि बेदरकार वृत्ती जबाबदार आहे. खड्ड्यात पडून कल्याण डोंबिवलीतील अपघात होण्याचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक असते.
यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे, इतस्त्तः पडलेले दगड धोंडे यामुळे वाहतूक खोळंबा तर होतोच पण रस्त्यावर पसरलेल्या दगडांनी वाहनचालक गंभीर जखमी झालेत आणि नागरिकांचे बळीही खड्ड्यांनी घेतले आहेत. याकरिता महापालिका प्रशासन दोषी आहेच पण दुर्दैव असे की झालेल्या घटनांमधून पालिका प्रशासन काहीच बोध घेत नाही एवढी यंत्रणा संवेदनाहीन, निष्काळजी आणि मुर्दाड झालेली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कोपर उड्डाणपूल तात्काळ खुला करा
डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला करणे अत्यावश्यक झाले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीने डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. कोपर पुलामुळे पूर्व पश्चिम वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी व्हावी. संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.