...अन्यथा हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल! पाण्यासाठी रहिवाशांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 02:24 AM2021-03-22T02:24:50+5:302021-03-22T02:25:06+5:30
एमआयडीसीतील सुदर्शननगरमध्ये पाण्याचा ठणठणाट
डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत कमी दाबाने येते तर काहींना पाणीच मिळत नाही. हा त्रास वर्षभर सुरू असल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल अथवा ‘रास्ता रोको’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
एमआयडीसीकडून होणारा पुरवठा शुक्रवारी बंद होता. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. ही समस्या वर्षभर असून काहींना पाणी मिळत नसल्याकडे सुदर्शननगर निवासी संघाचे सचिव विवेक पाटील यांनी लक्ष वेधले आहे. परिसरातील परिचय, मित्रधाम, नव जयश्री, पुरुजीत या सोसायट्यांसह अन्य सोसायट्यांना शुक्रवारपासून पुढील तीन दिवस पाणीच येत नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. दोन ते तीन महिन्यांपासून संबंधित सोसायट्यांतील रहिवासी एमआयडीसीतील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करत आहेत. प्रत्येकवेळी काहींना काही कारणे देऊन तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नाही. आरएक्स २१, आरएक्स २२ आणि आरएक्स २३ साठी जलवाहिनी टाकलेली नाही. ज्या सोसायटीसाठी जलवाहिनी टाकली त्यांनाही पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाण्याविना रहिवाशांचे हाल सुरू असून एमआयडीसीत राहत असूनही पिण्यासाठी बाहेरून बाटलीबंद पाणी व टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. ही शरमेची बाब असल्याचे पाटील यांनी एमआयडीसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
गृहसंकुलात पाणीटंचाई
कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील स्वराज नेपच्युन या गृहसंकुलातील रहिवाशांनाही वर्षभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गृहसंकुलात दोन सेक्शन आहेत. एकामध्ये सात माळ्यांचे १० टॉवर आहेत. वर्षभरापूर्वी एक तास पाणी यायचे, ते मुबलक होते. पण काही महिन्यांपासून १० ते १५ मिनिटेच पाणी येते तेही एकदिवसाआड येत असल्याने तीव्र पाणीटंचाई भेडसावत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.