आपलं वर्तन व काम पर्यावरण पूरक असावं : आयुक्त डॉ. दांगडे
By सचिन सागरे | Published: June 4, 2023 04:49 PM2023-06-04T16:49:11+5:302023-06-04T16:49:30+5:30
महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ‘निर्सगोत्सव २०२३’चे उद्घाटन आयुक्त डॉ. दांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.
कल्याण : आपलं वर्तन व काम पर्यावरण पूरक असावं, याची जाणीव सर्वांना होण्यासाठी निसर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ‘निर्सगोत्सव २०२३’चे उद्घाटन आयुक्त डॉ. दांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेने अभिनव अशा निर्सगोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी विविध एनजीओच्या सहकार्याने शहरात ठिकठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयातील प्रदर्शन हे नागरिकांसाठी विनामूल्य असून रविवार आणि सोमवार या दोन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रदर्शनात विविध प्रकारची झाडे, बागकामासाठी लागणारी औजारे, निसर्गाशी, पर्यावरणाशी निगडीत पुस्तके, किचन गार्डनिंग, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती व या मूर्ती बनविणे बाबत मार्गदर्शन, सर्पमित्र व प्राणी मित्र यांचेकडून सादरीकरण, टाकाऊतून तयार केलेल्या टिकाऊ पिशव्या, बाल निसर्ग प्रेमी अर्णव पटवर्धन याचे विविध पक्षांबाबतचे सचित्र सादरीकरण असे विविध प्रकारचे स्टॉल नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध आहेत.