मनसेला मंत्रिपद देण्यास आमचा विरोध; त्यांचा काही संबंधच येत नाही- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 08:55 PM2022-07-10T20:55:58+5:302022-07-10T20:56:26+5:30
आठवले हे एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक केले.
कल्याण: मंत्रिमंडळात एखादे मंत्रिपद आम्हाला मिळेल अशी आशा आहे. परंतु मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणुकीत आमच्या बरोबर नव्हते. त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे, मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले.
अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर सेना भाजपाने एकत्र आले पाहिजे हे मी आधीपासूनच सांगत होतो. परंतु उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकून चुकीचा निर्णय घेतला आणि तेव्हापासूनच शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. याची परिणीती आमदारांच्या बंडखोरीच्या माध्यमातून समोर आली याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रविवारी आठवले हे एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक केले.
अनेक वर्षे शिवसेनेत वाढलेले, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केलेले, आनंद दिघे यांचा आशिर्वाद असलेले एकनाथ शिंदे हे नेते असून त्यांनी केलेले बंड हे महाबंड आहे. दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार आपल्या बाजुने वळविण्यात शिंदे यांना यश आले आहे. उद्धव ठाकरे यांना या आमदारांना सांभाळता आले नाही आणि ते आमदार भाजपचे आहेत अशा पध्दतीचा आरोप जे संजय राऊत करत आहेत ते अत्यंत चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला कंटाळून आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी संबंधित आमदार वेगळे होऊन त्यांनी शिवसेनेत आपला अधिकृत गट तयार केला आहे.
सध्या अधिवेशनापूरते मंत्रीमंडळ हे कमी मंत्र्यांचे होणार आहे. मात्र जेव्हा मंत्रीमंडळाचा विस्तार होईल तेव्हा एखादे मंत्रीपद आरपीआयला नककीच मिळेल. एखादे एमएलसी, महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे यासाठीही आमचे प्रयत्न आहेत असे आठवले म्हणाले. कुठल्या तरी एखादया कामासाठी मुख्यमंत्री बोलत असतील आणि त्याचा कोणी व्हीडीओ काढला तर त्यात गैर काही नाही. एखादया अधिका-याला काम करणे असे सांगणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकारच आहे याकडे आठवले यांनी लक्ष वेधले.