किल्ले दुर्गाडी प्रमाणे श्री मलंगगडचा निकाल लागणार - एकनाथ शिंदे
By पंकज पाटील | Updated: February 12, 2025 19:44 IST2025-02-12T19:43:54+5:302025-02-12T19:44:01+5:30
बुधवारी माघ पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री मलंगगडावर आले होते

किल्ले दुर्गाडी प्रमाणे श्री मलंगगडचा निकाल लागणार - एकनाथ शिंदे
अंबरनाथ: किल्ले दुर्गाडी प्रमाणे श्री मलंगगडाचा निकाल लागणार असा विश्वास उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केला आहे. बुधवारी माघ पौर्णिमेनिमित्त ते मलंगगडावर आले होते.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघ पौर्णिमेला मत्स्येंद्रनाथ यांची आरती करतात. मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचे यावरून १९५२ सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे. हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचे मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजीमलंग शाह बाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे. सद्यस्थितीत दोन्ही धर्माचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात. मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली. ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जात आहे. दरम्यान,बुधवारी मलंगगडावर महाआरती झाल्यानंतर शिंदे म्हणाले कि,आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे, दुर्गाडी प्रमाणे मलंगगडचा निकाल देखील लवकरच लागेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.