...तेव्हा २० वर्षीय जखमी हर्षलने धीराने केला परिस्थितीचा सामना; कुटुंबाला दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:29 IST2025-04-24T08:27:55+5:302025-04-24T08:29:05+5:30

अतिरेक्यांनी वडील, काकांना ठार केले, अनोळखी ठिकाणी कुटुंबातील मुलींना दिला धीर

Pahalgam Terror Attack: 20-year-old injured Harshal bravely faced the situation; provided support to his family | ...तेव्हा २० वर्षीय जखमी हर्षलने धीराने केला परिस्थितीचा सामना; कुटुंबाला दिला आधार

...तेव्हा २० वर्षीय जखमी हर्षलने धीराने केला परिस्थितीचा सामना; कुटुंबाला दिला आधार

प्रशांत माने

डोंबिवली : घरातील काही मंडळी विश्रांती घेत होती. काश्मीरमध्ये फिरायला गेलेले संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी गप्पा मारत पुढील प्रवासाचे नियोजन करीत असताना अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. माझ्या डोळ्यांदेखत हे तिघे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले व त्यांचा मृत्यू झाला.

अतिरेक्यांची एक गोळी माझ्या हाताच्या बोटाला चाटून गेल्याने मीही जखमी झालो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तिघांना मी ‘उठा.. उठा..’ म्हणत होतो. सोबत असलेल्या सर्व महिला व लहान मुलांना सुखरूप घरी आणण्याची जबाबदारी माझ्यावर आल्याची जाणीव झाली. संजय लेले यांचा २० वर्षांचा मुलगा हर्षलने हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला तेव्हा त्याला हुंदका आवरला नाही. आपले दु:ख गिळून तीनही कुटुंबांना सांभाळून धीराने सामना त्याने केला. 

एकट्याने गेला प्रसंगाला सामोरा 
संजय देसले, अतुल मोने आणि हेमंत जोशी हे मावसभाऊ फिरत होते. त्यांच्यासोबत हर्षल होता. कुटुंबातील उर्वरित सदस्य झोपले होते. अतिरेक्यांनी पुरुष मंडळींना हेरून त्यांच्यावर गोळीबार केला. कुटुंबातील व्यक्तींना गोळीबाराच्या आवाजाने जाग आली तोपर्यंत अतिरेकी गोळीबार करून पसार झाले होते. गोळीबारात संजय, अतुल आणि हेमंत यांचा मृत्यू झाला तर हर्षलच्या हाताच्या बोटाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला. 

गोळीबार थांबल्यानंतर घोडेस्वारांच्या मदतीने कुटुंबाला सुरक्षित स्थळी नेले. हा घडलेला प्रकार हर्षलने नातेवाईक असलेले शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांना सांगितला. कदम बुधवारी काश्मीरला रवाना झाले. तोपर्यंत हर्षल हॉस्पिटल, पोलिस यंत्रणा, शवागार, पोस्टमार्टेम या सगळ्या प्रसंगाला सामोरा गेला.

बोटाला गोळी लागली, तरी धीरोदात्तपणा टिकून
संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताच्या बोटाला अतिरेक्याची गोळी लागून तो किरकोळ जखमी झाला. लेले यांची पत्नी कविता, अतुल यांची पत्नी अनुष्का, मुलगी १६ वर्षीय ऋचा, हेमंत यांची पत्नी मोनिका व १५ वर्षांचा मुलगा ध्रुव असे सहा जण सुखरूप आहेत. 

खा. श्रीकांत शिंदेंचे पथक रवाना 
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी रात्रीच त्यांचे पथक श्रीनगरला रवाना केले. पथकासोबत दाखल झालेले स्वीय सहायक अभिजित दरेकर यांना संकटग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्यास सांगितले होते. आ. रवींद्र चव्हाण, राजेश मोरे आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आदी कुटुंबीयांच्या मदतीसाठी संपर्कात होते.

Web Title: Pahalgam Terror Attack: 20-year-old injured Harshal bravely faced the situation; provided support to his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.