आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:17 IST2025-04-24T06:16:41+5:302025-04-24T06:17:30+5:30

हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्या! दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची बातमी पाहताच पांडे यांनी हेमंत यांना मेसेज केला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही

Pahalgam Terror Attack; Are we safe in our country?; A frustrated question from Dombivali residents | आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल

आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल

प्रशांत माने

डोंबिवली  - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले या मावसभावांचा दहशतवादी हल्ल्यात मंगळवारी मृत्यू झाला. घरातील तरुण कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मृत्यूच्या आघातामुळे आप्तस्वकीय, मित्र, तसेच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी तीव्र शोक व्यक्त केला. कुटुंबासमवेत गेलेल्या पर्यटकांनाच जर दहशतवादी गोळ्या घालत असतील, तर आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का? असा सवाल रहिवाशांनी केला.

शिपिंग कंपनीत असलेले ४३ वर्षीय हेमंत जोशी पत्नी मोनिका आणि मुलगा ध्रुवसह डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानासमोरील सावित्री को-ऑप. सोसायटीत चौथ्या मजल्यावर राहायचे. हेमंत परिवारासह रविवारी डोंबिवलीतून जम्मू-काश्मीरसाठी रवाना झाले. आम्ही सात दिवसांत येतो, असे त्यांनी सोसायटीचे चेअरमन जी. एन. पांडे यांना सांगितले होते. दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची बातमी पाहताच पांडे यांनी हेमंत यांना मेसेज केला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पांडे यांनी  हेमंत यांच्या सासऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी हेमंत यांचा मुलगा ध्रुव याने सुखरूप आहोत, असा मेसेज पाठविल्याचे सांगितले. तथापि रात्री टीव्हीवर हेमंतच्या मृत्यूची बातमी आली, पण आमचा विश्वास बसेना. आम्ही  पुन्हा त्यांच्या सासऱ्यांशी संपर्क साधला असता हेमंत यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला, असे पांडे, तसेच हेमंत यांचे शेजारी प्रमोद गुप्ता यांनी सांगितले.

मुलाची परीक्षा होताच काश्मीर सहलीचा प्लॅन
हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव याने यंदा दहावीची परीक्षा दिली. तत्पूर्वीच जोशी कुटुंबाने नातेवाईक असलेल्या लेले आणि मोने कुटुंबासमवेत जम्मू-काश्मीरला जाण्याचा प्लॅन केला. रविवारी तिन्ही कुटुंबे डोंबिवलीहून रवाना झाली; परंतु हेमंत आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मृत्यूने नातेवाइकांसह इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये शोककळा पसरली.

तू हो पुढे, मी येतोच आहे
डोंबिवलीतील ४४ वर्षीय अतुल मोनेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. पत्नी अनुष्का, मुलगी ऋचा सुखरूप आहेत. पश्चिमेकडील सम्राट चौकात श्रीराम अचल सोसायटीत राहणारे अतुल मध्य रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता होते. इथले रहिवासी महेश सुरसे २२ मे रोजी काश्मीरला जाणार होते. अतुल यांनी रविवारी काश्मीरला जात असल्याचे महेश यांना सांगितले. त्यावर तू हो पुढे आणि मला तेथे काय काय पाहिले, कसे एन्जॉय केले, वातावरण कसे ते सांग, असे महेश अतुल यांना म्हणाले होते. त्यांच्या मृत्यूबद्दल खूपच वाईट वाटते. मी माझे २२ मे रोजीचे काश्मीरचे तिकीट रद्द केल्याचे महेश म्हणाले.

मंगळवारी रात्री टीव्हीवर बातमी बघितली होती. नाव आणि आडनाव साधर्म्य असलेला अन्य कोणीतरी संजय लेले असेल असे वाटले होते; परंतु बुधवारी संजयचा पेपरमध्ये फोटो पाहिला आणि एकच धक्का बसला. संजय अत्यंत जवळचा मित्र होता. त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडायचे - प्रवीण राऊळ, संजय लेले यांचे बालपणीचे मित्र

Web Title: Pahalgam Terror Attack; Are we safe in our country?; A frustrated question from Dombivali residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.