"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

By कोमल खांबे | Updated: April 24, 2025 18:44 IST2025-04-24T18:42:25+5:302025-04-24T18:44:33+5:30

लग्नाचा तिसरा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी प्लॅन केलेली ट्रिप अशी भयावह होऊ शकते, याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केलेला नसेल. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेलेलं कल्याणमधील साईली पवार आणि सिद्धार्थ यादगिरे ट्रिपचा एक भयानक अनुभव गाठीशी घेऊन परतले आहेत. सुदैवाने या हल्ल्यातून ते वाचले. 

pahalgam terror attack kalyan couple sailee pawar and siddharth shared horrifying experience | "अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

>> कोमल खांबे

लग्नाचा तिसरा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी प्लॅन केलेली ट्रिप अशी भयावह होऊ शकते, याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केलेला नसेल. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेलेलं कल्याणमधील साईली पवार आणि सिद्धार्थ यादगिरे ट्रिपचा एक भयानक अनुभव गाठीशी घेऊन परतले आहेत. सुदैवाने या हल्ल्यातून ते वाचले. 

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं होईल, असा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल. पण, 'पृथ्वीवरचं नंदनवन' मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये जे घडलं, त्या जखमा कधीच पुसल्या जाणाऱ्या नाहीत.  साईली आणि सिद्धार्थ या जोडप्यानेही काश्मीरचा असाच धसका घेतला आहे. 

कल्याणला राहणारे साईली आणि सिद्धार्थ जम्मू-काश्मीरमध्ये सुट्ट्या सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. शनिवारी (१९ एप्रिल) ते दोघं काश्मीरला पोहोचले होते. १९ एप्रिल ते २७ एप्रिल अशी ९ दिवसांची ट्रिप त्यांनी प्लॅन केली होती. मात्र अवघ्या तीनच दिवसात त्यांना माघारी परतावं लागलं. आपल्याला अशा पद्धतीने ट्रिप संपवावी लागेल, याचा त्यांनी कधीही विचार केला नसेल. 

खरं तर साईली आणि सिद्धार्थ या दोघांनाही प्रवासाची प्रचंड आवड. याआधीही या जोडप्याने देशातच नव्हे तर परदेशातही अनेक ट्रिप केल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी यंदा काश्मीरची ट्रिप प्लॅन केली होती. काश्मीरमध्ये आल्यानंतर पर्यटकांचं आकर्षण असलेलं ट्युलिप गार्डनला त्यांनी भेट दिली होती.  त्यानंतर, जिथे दहशतवादी हल्ला झाला त्याच ठिकाणी पहलगाममधील बैसरंग व्हॅलीमध्ये ते हल्ल्याच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवारी गेले होते. मंगळवारी सकाळी साईली आणि सिद्धार्थ यांनी पहलगाम सोडलं आणि ते गुलमर्गला पोहोचले. प्रवासात असतानाच, बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ला झाल्याचं समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. 

गुलमर्गला हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना दुसरा धक्का बसला. कारण, अख्खं हॉटेलच रिकामं होतं. हॉटेलमध्ये दोन कर्मचारी आणि त्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. काय करायचं हे त्यांना कळतच नव्हतं. त्यामुळे भीतीपोटी ते दिवसभर हॉटेलमधून बाहेरच पडले नाहीत. संध्याकाळी एक हिंदू फॅमिली त्यांच्या मुलांसह तिथे आल्यानंतर त्यांची भीती थोडी कमी झाली. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता त्यांच्या रुमचा दरवाजा वाजला. हॉटेलमध्ये आलेली हिंदू फॅमिली फ्लाइटचं बुकिंग झाल्याने "आम्ही जात आहोत, तुम्हीदेखील लवकर निघा", असं सांगायला आली होती. त्यामुळे साईली आणि सिद्धार्थनेही हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला. 

बुधवारी गुलमर्ग सोडत त्यांनी थेट श्रीनगर गाठलं. थोडा वेळ हॉटेलमध्ये थांबून त्यांनी फ्लाइट बुक करण्याचा प्रयत्न केला. पण, फ्लाइटचं बुकिंगच होत नव्हतं. शेवटी त्यांनी श्रीनगर एअरपोर्टला जायचं ठरवलं. पण, एअरपोर्टवर प्रचंड गर्दी...इकडे त्यांच्या घरच्यांचा जीव टांगणीला लागलेला. दिवसभर प्रयत्न करूनही काही केल्या फ्लाइटचं बुकिंग होईना त्यामुळे वेगळंच टेन्शन. शेवटी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फ्लाइटची व्यवस्था केल्यानंतर त्यांच्याबरोबर घरच्यांचा जीव भांड्यात पडला आणि गुरुवारी सकाळी ४च्या सुमारास ते मुंबईत सुखरुप परतले. 

"असं कधी होईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता. आम्ही सोमवारी तिथे गेलो तेव्हा असं काही वाटलंच नव्हतं. तिथे आर्मीचे जवान सुरक्षेसाठी तैनात होते. त्यामुळे आम्हाला कसली भीतीही वाटली नव्हती किंवा शंकेची पालही मनात चुकचुकली नव्हती. आम्ही घरी परतलो असलो, तरी अजून त्याच शॉकमध्ये आहोत.  यापुढे कधीच काश्मीरला जायचं नाही असं आम्ही ठरवलंय. अजूनही बैसरंग व्हॅलीचे फोटो बघितले की तेच आठवत आहे", अशा भावना साईलीने व्यक्त केल्या आहेत.

Web Title: pahalgam terror attack kalyan couple sailee pawar and siddharth shared horrifying experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.