पलावा जंक्शन आणि काटई रेल्वे उड्डाणपूलाच्या पोहच रस्त्याचा मार्ग मोकळा
By मुरलीधर भवार | Published: March 19, 2024 05:26 PM2024-03-19T17:26:49+5:302024-03-19T17:27:36+5:30
पोहच रस्त्याकरीता आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने करण्यात यावे असे आदेश कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत.
कल्याण-कल्याण शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन आणि काटई रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. या दोन्ही पूलांकरीता पोहच रस्ता हवा आहे. या पोहच रस्त्यात खाजगी जमीन मालकांची जागा बाधित होते. त्यांनी या पूलाचे काम दोन वेळा बंद पाडले होते. त्यांना त्यांचा मोबदला दिला जात नसल्याने हा प्रकार घडला होता. आत्ता राज्य रस्ते विकास महामंडळाने महसूल खात्याकडे १९ कोटी ५५ लाख रुपयांचा मोबदला वर्ग केला आहे. पोहच रस्त्याकरीता आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने करण्यात यावे असे आदेश कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत.
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरीत २० टक्के काम शिल्लक आहे. २० टक्के जागा संपादीत झालेली नाही. ही २० टक्के जागा खाजगी जमीन मालकांची आहे. त्यात १५० लोक बाधित होत आहे. त्यांच्या मोबदल्याचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहे. मोबदल्याची रक्कम ३०७ कोटी रुपये देण्याचे ठरले आहे. यासाठी सर्व पक्षी युवा मोर्चाचे प्रमुख गजानन पाटील हे प्रयत्नशील आहेत.
मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी या पूलाच्या कामात रखडपट्टी होत असल्याच्या मुद्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ३०७ कोटी रुपये रक्कमेत कल्याण शीळ रस्ते बाधिताचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. सध्या पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूलाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या कंत्राटदार कंपनीकडून सुरु आहे. त्याचबरोबर कल्याण शीळ रस्त्याला खालून दिवा पनवेल रेल्वे मार्ग आहे. त्याचबरोबर डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचा रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. सध्या काटई जुना रेल्वे उड्डाणपूल अस्तित्वात आहे.
याठिकाणी नवा रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. पलावा जंक्शन उड्डाण पूल आणि काटई रे्ल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. हो काम मार्गी लावायचे आहे. हे काम सुरु असताना दोन वेळा काटईतील प्रकल्प बाधितांनी त्यांच्या जमीनीचा मोबदला दिला गेला नसल्याने काम बंद पाडले होते. ३०७ कोटी मोबदला रक्कमेपैकी तूर्तास १९ कोटी ५५ लाख रुपये मोबदला रक्कम महसूल खात्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या रक्कमेतून बाधितांची जमीन संपादीत करुन उड्डाणपूलाच्या पोहच रस्ता विकास कामातील अडथळा तातडीने दूर करावा असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना सूचित केले आहे. रस्ते प्रकल्पातील उर्वरीत बाधितांच्या माेबदला रक्कमेचा विषयही लवकर मार्गी लावला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.