अंध विद्यार्थ्यांसह पालकांनी गाणी गाऊन केल्या भावना व्यक्त; ५० अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचें वाटप
By अनिकेत घमंडी | Published: August 17, 2023 12:37 PM2023-08-17T12:37:55+5:302023-08-17T12:38:05+5:30
डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त ...
डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त व्हायचं असतं. अनेक सामाजिक संस्था अलिकडच्या काळात आमच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. सहकार्य करतात त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आम्ही अशा संस्था, लोकप्रतिनिधी यांचे आभारी आहोत, आमच्या।मुलांना देखील पुढे भविष्यात प्रगती करायची आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीने आपण कार्यरत राहू, संपर्कात राहू अशा भावना अंध विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त गाणी गाऊन व्यक्त केल्या.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी या संस्थेच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष अलंकार तायशेटे यांच्यासह प्रकल्प अध्यक्ष अजय जैन आदींनी जयहिंद अंध कल्याणकारी संस्था, अंबरनाथ या संस्थेच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मानपाडा रस्त्यावरील शुभम बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ५० शाळकरी मुलांना बॅग, छत्री, वह्या यासह शालेपयोगी वस्तूंचे वाटप केले. त्यापैकी बहुतांशी पालक हे अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे अलंकार म्हणाले, तुलनेने त्यांना रोजगाराची संधीही कमीच मिळते. तरी ते आपल्या मुलांना शाळेत शिकवून मोठे करण्यासाठी धपडत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याकरिता अशा मदतीद्वारे काहीसा हातभार लागतो, असेही अलंकार म्हणाले.
अजय जैन यांनी संस्थेद्वारे असा हा कार्यक्रम राबवण्याचे यंदाचे दहावे वर्ष आहे. माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत वह्या उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला मुलांनी व पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मुलांनी,.पालकांना गाणी गायली, कविता म्हंटल्या, व्याख्यान दिले. वातावरण पाहून काही अंध पालकांनी ही गाणी म्हणून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुलांनी त्यांच्या समाजाकडून काय अपेक्षा आहेत हे समजावून सांगितले, तर पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांना काय बनवायचे आहे याबद्दलची स्वप्न सांगून त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप शिकावे लागणार आहे, चांगला व्यक्ती बनायचं आहे असे मत व्यक्त केले. संस्थापकिय अध्यक्ष प्रकाश भराडे , महासचिव सुरेश पवार व कोषाध्यक्ष निशा रघुवंशी हे जयहिंद संस्थेतर्फे या कार्यक्रमासाठी उपस्थि होते.