डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला; दोघे अडकले, शोधकार्य सुरू
By प्रशांत माने | Published: September 15, 2023 07:00 PM2023-09-15T19:00:52+5:302023-09-15T19:01:53+5:30
सध्या त्याठिकाणी पाच ते सहा कुटुंब वास्तव्यास होती. सकाळपासूनच इमारतीची पडझड सुरु होती.
डोंबिवली: येथील पुर्वेकडील जूना आयरे रोड परिसरातील लक्ष्मणरेषा आदिनारायण भुवन या अतिधोकादायक तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना आज दुपारी साडेचार च्या सुमारास घडली. यात दोनजण ढिगा-याखाली अडकले आहेत. इमारतीत ४० खोल्या आहेत परंतू इमारत अतिधोकादायक असल्याने बहुतांश कुटुंबाने तेथील घरं खाली केली होती.
सध्या त्याठिकाणी पाच ते सहा कुटुंब वास्तव्यास होती. सकाळपासूनच इमारतीची पडझड सुरु होती. महापालिकेचे पथक देखील घटनास्थळी दाखल होत त्यांनी देखील घरं खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास रहिवाशांना घरातून बाहेर काढताना इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. यात दिप्ती लोढीया वय ४५ आणि अरविंद लोढीया वय ७० हे दोघे आजारी आणि बेडवर उपचार घेणारे मात्र बाहेर पडू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. आयुक्त भाऊसाहेब दांडगे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह राजकीय पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.