डोंबिवली स्थानकातील मुंबईकडच्या पादचारी पुलाचा काही भाग ४० दिवस बंद राहणार
By अनिकेत घमंडी | Published: December 28, 2023 07:44 PM2023-12-28T19:44:57+5:302023-12-28T19:45:13+5:30
फलाट ३/४ वरून पुलावर जाणाऱ्या पायर्यांच्या कामाची होणार डागडुजी
डोंबिवली: मध्य रेल्वेच्यादृष्टीने प्रवाशांसाठी महत्वाचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकातील मुंबई दिशेकडील फलाट३/४ च्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांची डागडुजी करण्याचे काम ३० डिसेंबरपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून त्या पुलाचा तो भाग साधारणपणे ४० दिवस प्रवासी सेवेत नसेल असे रेल्वे प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले.
प्रवाशांनी त्या कामाची नोंद घेऊन प्लेटफार्म ३/४ वर जाण्यासाठी मिडल ब्रिजचा व कल्याण बाजूकडील ब्रिजचा उपयोग करावा असे आवाहन स्थानक प्रबंधक कार्यालय, रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. या स्थानकात एकूण तीन पादचारी पूल असून मुंबईकडील पूल सुमारे १९८० च्या दशकात बांधण्यात आला आहे, त्याची वरचेवर विविध भागाची डागडुजी करून प्रवासी हिताची काळजी घेतली जाते त्यादृष्टीने हे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.