वाचन प्रेरणा स्पर्धेत केडीएमसी हद्दीतील ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
By मुरलीधर भवार | Published: December 15, 2022 06:32 PM2022-12-15T18:32:26+5:302022-12-15T18:32:43+5:30
"शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत महापालिकेने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सर्वभाषिक विद्यार्थी यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी."
कल्याण - वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने मातृभाषेचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगता आला असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आज केले.
शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत महापालिकेने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सर्वभाषिक विद्यार्थी यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी. मराठी भाषेबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून विविध स्पर्धां उपक्रमांचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या परितोषिक वितरणाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी हे उद्गार काढले.
वृत्तपत्रीय मथळा स्पर्धा, गद्य वाचन स्पर्धा, बोली भाषा स्पर्धा, स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, स्वरचित चारोळी स्पर्धा, स्वलिखित घोषवाक्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणी, वाक्प्रचार व सुविचार लेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन वाचन प्रेरणा महोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आले या स्पर्धामध्ये महापालिकेच्या वर्ग-१, वर्ग-२ च्या अधिका-यांनी आणि वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांनी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सुमारे ४० हजार विदयार्थी-विदयार्थीनींनी सहभाग घेतला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडला. या वितरण पारितोषिक सोहळयाप्रारंभी कल्याणमधील कदम कुटुंबीयांच्या "कुटुंब रंगले वाचनात" या उपक्रमाबाबत कदम कुटुंबियांशी महापालिका सचिव संजय जाधव यांनी चर्चा केली या चर्चेमध्ये कदम कुटुंबीयांनी त्यांच्या वाचनाच्या प्रचाराबाबत आणि त्यामुळे इतरांनाही लागलेल्या वाचनाच्या गोडीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश देशपांडे व दत्तात्रय लदवा यांनी केले.